डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी मिलापनगर परिसरात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामावरून गुरुवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आपआपसात भिडले. काही क्षणात या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले .या हाणामारीत राष्ट्रवादीचे चार ते पाच कार्यकर्ते जखमी झाले आहेत . याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. निकृष्ट दर्जाचं काम असल्याने आम्ही जाब विचारला त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तेजस पाटील यांनी केलाय.


युवा सेनेचे जिल्हा समन्वयक योगेश म्हात्रे यांना रस्त्याचे काम सुरू असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला. त्याचाच राग येऊन त्यांनी वाद घालत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, एकत्र सत्तेत असणाऱ्या दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांच्या आपापसातील वादामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय .


डोंबिवली एमआयडीसी परिसरात रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास नागरिकांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन निकृष्ट दर्जाचे काम असल्याचा आरोप करत शिवसेना कार्यकर्त्यांना जाब विचारला. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. काही क्षणात या वादाचे रूपांतर हाणामारीत झालं. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करत जाब विचारल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी दादागिरी करत मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस तेजस पाटील यांनी केलाय. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तर या भागातील युवा सेना पदाधिकारी योगेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काम सुरू असलेल्या ठिकाणी आले होते. त्यांनी कामाच्या दर्जाबाबत विचारणा केली असता शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महापालिकेला विचारा असे सांगितले. याचाच राग येऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानी  शिवसेना कार्यकर्त्याना मारहाण केली त्यामुळे हा वाद चिघळल्याचे सांगितलं.


संबंधित बातम्या :