कल्याण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने नालेसफाईची कामे सुरु केली आहेत. नालेसफाईच्या कामाची काम (19 मे) महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे 30 टक्के पूर्ण झाली असून पावसाळ्याआधी नालेसफाई पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. पाऊस अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना अद्याप नालेसफाई 30 टक्केच झाली आहे, त्यामुळे आठवडाभरात नालेसफाई होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कल्याण डोंबिवली शहरात पावसाच्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा व्हावा आणि शहरात पाणी तुंबण्याच्या घटनापासून नागरिकांची सुटका व्हावी यासाठी दरवर्षीप्रमाणे महापालिका प्रशासनाने नालेसफाई सुरु केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील 10 प्रभागातील मोठ्या नाल्याची सफाई प्रशासनाकडून सुरु झाली असून छोट्या नाल्याची सफाई पालिकेच्या घनकचरा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. यंदा पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 4 मे पासून नालेसफाई सुरु करण्यात आली आहे. महापालिका आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांसह नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. यावेळी आयुक्तांनी हे काम 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य अधिकारी वर्गाला आखून दिले आहे.
शहरात 95 मोठ्या आकाराचे नाले आहेत. त्यांची लांबी 97 किलोमीटरपर्यंत आहे. नालेसफाईचे काम विभागून विविध कंत्रटदारांना दिले आहे. हे काम यंदा 3 कोटी 75 लाख रुपये खर्चाचे आहे. मागच्या वर्षी नालेसफाईच्या कामावर 3 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च झाला होता. कंत्रटदार नाल्यातून किती क्युबिक मीटर गाळ काढतो. त्याच्या प्रमाणानुसार त्याला केलेल्या कामाचे बिल दिले जाणार असल्याची माहिती दिली. मात्र नालेसफाईचा वेग पाहता यंदा पाऊस लवकर धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अवघ्या दहा दिवसात शहरातील नालेसफाई पूर्ण कशी होणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.
दरम्यान कल्याण-डोंबिवली शहरात दरवर्षी केडीएमसीकडून नालेसफाई 100 टक्के झाल्याचा दावा केला जातो. मात्र पावसाळ्यात या दाव्याची पोलखोल होते. यंदा देखील प्रशासनाकडून नालेसफाई युद्धपातळीवर सुरु असून पावसाळ्याआधीच नालेसफाई पूर्ण करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा दावा कितपत खरा ठरतो हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल.
तर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी नालेसफाईबाबत प्रशासनाला लक्ष केलं आहे. यंदा लवकर पावसाळ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरवात करायला पाहिजे होते नुसतं पाहणी करुन काही होणार नाही ज्या ठिकाणी नालेसफाई झाली त्या ठिकाणी पाहणी केली जाते. अनेक गटारी मुख्य नाले अजूनही गाळाने कचऱ्याने भरलेले पाहायला मिळत असल्याची टीका केली.