कल्याण :  स्वच्छ शहरांच्या यादीत कल्याण डोंबिवलीचा 234वा क्रमांक आहे. जर केडीएमसीचे सफाई कर्मचारी पालिकेत दांड्या मारून बिल्डर बनत असतील तर शहराच्या स्वच्छतेचे तीन तेरा तर वाजणारच.

गळ्यात अजगराच्या पिल्लाच्या आकाराच्या सोनसाखळ्या, पाचही बोटात हिऱ्याच्या आणि सोन्याच्या अंगठ्या, मनगटावर महागडं घड्याळ. हा अवतार आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतला सफाई कर्मचारी अजय सावंतचा.

अजय सावंत कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यावर झाडू मारत असेल यावर कोण विश्वास ठेवणार? अजय सावंतची साफसफाई फक्त हजेरीच्या मस्टरपुरतीच. प्रत्यक्षात हा पठ्ठा बिल्डर असल्याचा आरोप माजी महापौर वैजयंती घोलप यांनी केला आहे.



सफाई कर्मचारी असून बिल्डिंग बांधणाऱ्या अजय सावंतंची पोच देखील बरीच आहे. अजयच्या कार्यालयाचं उद्घाटन भाजप आमदार नरेंद्र पवारांनी केलं होतं. या कार्यक्रमाला अनेक पक्षाचे स्थानिक नेतेही जातीनं हजर होते.

शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव हे देखील अजय सावंतचे हितचिंतक असल्याचं समजतं आहे. मात्र कॅमेऱ्यासमोर बोलताना त्यांनी अजयला ओळखत नसल्याचं सांगितलं.

वैजयंती घोलप यांनी अजय सावंतच्या गैरहजेरीचा मुद्दा महासभेत उपस्थित केल्यामुळं प्रशासनाची देखील चांगलीच गोची झाली आहे.

स्वतःची कातडी वाचवण्यासाठी अजय सावंतची कदाचित चौकशी केली जाईल. मात्र, एका सफाई कर्मचाऱ्याला बिल्डर बनवणाऱ्यांचं काय? त्यांच्यावर कारवाई होणार की काळाच्या पडद्याआड या प्रकरणावर पडदा टाकला जाणार?