मुंबई : मुंबई, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मान्सून सक्रीय झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं आहे. आज सकाळी केलेल्या परीक्षणात मान्सून गुजरातच्या वलसाडपर्यंत तसंच मुंबई, नाशिक आणि मराठवाड्यातील परभणी भागात सक्रीय झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
विशेष म्हणजे, पुढच्या 48 तासात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या 15 ते 18 जूनपर्यंत राज्यभर मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज मुंबई हवामान विभागानं वर्तवला आहे.
मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी
आज राज्यात दाखल होण्याआधी पासूनच पावसानं मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातल्या 74 तालुक्यात चांगला पाऊस झाला असून, 50 हून अधिक मंडळात अतिवृष्ठी झाली आहे. विशेषत: दुष्काळी लातूर, बीड, उस्मानाबादवर तर पावसाची खासच मर्जी झाली आहे. तर नांदेडमध्ये वीज पडून शेतात काम करणाऱ्या 5 महिलांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात दोन तास मुसळधार पाऊस
पुण्यात आज दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सलग दोन तास बरसलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत. मुसळधार पावसामुळे पुणे स्टेशन परिसरातील आरटीओ कार्यालयात पाणी साचलं आहे.त्यामुळे वाहन परवान्यासाठी रांगेत असलेल्या लोकांची चांगलीच पंचाईत झाली होती.
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धोकादायक पुल बंद
मनमाडमध्येही दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड आणि परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. वादळी पावसामुळे गेल्या 3 तासांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. तर निफाड, सिन्नर, इगतपुरी, नांदगाव तालुक्यातील आणि गावातील नाल्यावरील एकूण सहा धोकादायक पूल पावसाळ्यात बंद करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी कार्यालयानं जाहीर केलं.
विदर्भातील शेतकऱ्यांची पेरणीला सुरुवात
विदर्भात दमदार पाऊस सुरु झाला असून, शेतकऱ्यांची पेरण्यांसाठी लगबग सुरु झाली आहे. जोरदार पावसामुळे वाशिम आणि यवतमाळमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्यांची कामं हाती घेतली आहेत.