मुंबई: कर्नाटक विधानसभेत आज भाजपचा कस लागणार आहे. आज दुपारी 4 वा मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करायचं आहे. सुप्रीम कोर्टाने राज्यपालांनी दिलेली 15 दिवसांची मुदत अमान्य करत, आज दुपारीच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले.


कर्नाटकात आज सत्ता स्थापनेच्या निर्णायक टप्प्याला 'ऑपरेशन कमळ' असं नाव दिले आहे. या स्पेशल ऑपरेशन टीममध्ये पक्ष श्रेष्टींकडून महाराष्ट्रातून आमदार आशिष शेलार यांना पाचारण करण्यात आलं आहे.

सत्तेची जुळवाजुळव करण्यासाठी आशिष शेलार आज सकाळी बंगळुरूच्या दिशेने स्पेशल चार्टर्ड विमानाने रवाना झाले आहेत.

कर्नाटक निवडणुकीत आशिष शेलार यांच्याकडे 47 मतदारसंघाची जबाबदरी होती. बंगळुरु ग्रामीण आणि शहर या भागात आशिष शेलार निवडणूक काळात तळ ठोकून होते.

त्यामुळे कर्नाटकच्या लढाईसाठी भाजपने महाराष्ट्रातून कुमक पाठवली आहे.

येडियुरप्पांची अग्निपरीक्षा, दुपारी 4 वाजता बहुमत चाचणी 

कर्नाटक विधानसभेत आज मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची अग्निपरीक्षा आहे. कारण सुप्रीम कोर्टाने झटका देत येडियुरप्पांना आज दुपारी 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

224 जागांच्या कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भाजपला 104, काँग्रेसला 78, जेडीएस 38 आणि अन्य 2 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 112 इतका आहे.

मात्र सध्या भाजपकडे 104 आणि एक अपक्ष असे एकूण 105 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला अजूनही जागा कमी पडत आहेत. 

दुसरीकडे काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन करण्यासाठी मोकळीक दिली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसकडे मिळून 116 आमदारांचं बळ आहे.

त्यामुळे भाजप आज बहुमत कसं सिद्ध करणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.