Kanjur Marg Dumping Ground: मुंबई उपनगरातील डम्पिंग ग्राऊंडचा (Dumping Ground) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कांजुर मार्ग डम्पिंग ग्राऊंड (Kanjur Marg Dumping Ground) बंद करण्याच्या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. विक्रोळीत (Vikroli) पूर्व द्रुतगती मार्गावर शिंदे गटाने आंदोलन सुरू केलं आहे. शिवसेना विक्रोळी विधानसभा विभाग प्रमुख अनिल पांगारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे.


पूर्व द्रुतगती मार्ग रोखण्यात आल्याने ठाण्याहून मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली आहे. रास्ता रोको आंदोलनामुळे कांजुर मार्ग ते मुलुंडपर्यंत वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली आहे. ठाण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 


कांजुर मार्ग डम्पिंग ग्राऊंड हटवा, शिंदे गट आक्रमक


गेल्या काही वर्षांपासून या डम्पिंग ग्राऊंडच्या संदर्भात स्थानिकांनी वारंवार तक्रारी केल्या. डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचीही मागणी केली, मात्र अद्याप या डम्पिंग संदर्भात तोडगा काढण्यात आलेला नाही. अखेर डम्पिंग ग्राऊंडच्या समोरचा पूर्व द्रुतगती मार्गावरील रस्ता रोखून शिंदे गटाकडून आंदोलन करण्यात येत आहे. 


दुर्गंधीला कंटाळून कार्यकर्त्यांचं आंदोलन


डम्पिंग ग्राऊंडच्या दुर्गंधीला कंटाळून रास्ता रोको करत असल्याचं शिंदे गटाचे कार्यकर्ते अनिल पांगारे यांनी सांगितलं. कित्येक वर्षं ही दुर्गंधी स्थानिक नागरिक सहन करत आहेत आणि आजारांना सामोरं जात आहेत, असं ते म्हणाले. हे गोरगरिबांचं सरकार आहे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे, या मागणीसाठी रास्ता रोको करत असल्याचं ते म्हणाले. रास्ता रोको केल्याने जे वाहतूक कोंडीत थांबले आहेत, त्यांनाही या दुर्गंधीचा अनुभव येईल आणि सरकार योग्य ती पावलं उचलेल, असंही पांगारे म्हणाले.


...अन्यथा जन आंदोलन करणार


आठ-दहा दिवसांत दुर्गंधी थांबली पाहिजे, असा समज देण्यासाठी हा रास्ता रोको केला असल्याचं शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणाले. तरीही पुढे हा त्रास असाच राहिला तर जन आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. सौम्य पद्धतीने आता हा रास्ता रोको करण्यात आला असला तरी भविष्यात हे आंदोलन आणखी तीव्र होईल, अशा इशारा शिंदे गटाच्या वतीने देण्यात आला आहे.


हेही वाचा:


Ajit Pawar Nashik : कांद्याला हमीभाव नाही, टोमॅटोला दहा रुपये किलोचा भाव, जगायचं कसं? शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला