Eknath Shinde Shiv Sena : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्ष आप-आपला पक्ष विस्तार करत आहे. शिंदे गटाने देखील मुंबईत पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा आला आहे. मुंबईच्या कांदिवली, बोरिवली, दहिसर, मागठाणे भागातील मनसे, शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली आणि मंत्री उदय सावंत यांच्या हस्ते शिंदे गटात आज पक्ष प्रवेश केला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे, आमदार प्रकाश सुर्वे आणि इतर महत्वाचे नेते उपस्थित होते.


एकनाथ शिंदे 18 तास काम करणारे मुख्यमंत्री आहेत. हिंदुत्व रक्षणाचे शिवधनुष्य शिंदे साहेबांनी उचलले आहे. अभिनेते शरद पोंक्षे हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. म्हणजेच आमचेच खरे हिंदुत्व आहे, असे आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले. मी पक्ष का बदलला ? आमची शिवसेना भरकटली होती पवार आणि सोनिया यांच्या विचारांकडे चालली होती. हिंदुत्व व बाळासाहेब यांचे विचार विसरले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईतून जाणारा पहिला आमदार मी होतो, असे प्रकाश सुर्वे म्हणाले. 10,000 माणसे घेऊन दसरा मेळाव्याला येणार असल्याचेही यावेळी प्रकाश सुर्वे यांनी सांगितलं. आमचा निर्णय जनतेला मान्य म्हणून कार्यक्रमाला गर्दी असते, असेही सुर्वे यांनी सांगितलं. 


बाळासाहेब ठाकरे यांचे धनुष्य आणि दिघे साहेबांचे बाण आमच्याकडेच आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे आमच्याकडेच असणार, असं वक्तव्य यावेळी प्रकाश सुर्वे यांनी केले.  सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यामुळे आता आम्हास खात्री झाली की धनुष्यबाण आमच्याकडेच येईल, असेही प्रकाश सुर्वे म्हणाले.  


उदय सामंत काय म्हणाले?
आम्ही शिंदे गट म्हणून मेळावा घेत नाही आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून मेळावे घेत आहोत, असे यावेळी मंत्री उदय सामंत म्हणाले. 


आमचे नेतृत्व शिवसेनेचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील. आतापर्यंत मुंबईमध्ये जेवढा मेळावा झाले आहेत, या सर्व मेळाव्याच्या रेकॉर्ड तोड गर्दी आमच्या मेळाव्यामध्ये होणार आहे. मुंबईतील सर्व मेळाव्याच्या गर्दीचे रेकॉर्ड तोडले जातील, असा विश्वासही सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. 


ज्या पद्धतीनं या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी उपस्थित आहेत, यावरून दसरा मेळाव्याला बोरिवलीतील 20000 कार्यकर्ते येतील. अनेक लोकांनी शिंदे साहेबांना समर्थन करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे दसऱ्या मेळाव्यात गर्दीचा उच्चांक मोडला जाईल, असं वक्तव्य सामंत यांनी व्यक्त केलेय.