मुंबई : कमला मिल कम्पाऊंड अग्नितांडव प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना हायकोर्टाने दिलासा दिलेला नाही. 'मोजोस् ब्रिस्टो' पबचे मालक युग पाठक, 'वन अबव्ह' पबचे मालक जिगर संघवी, क्रिप्रेश संघवी आणि अभिजीत मानकर यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला.


जे घडलं तो अपघात असला, तरी ज्या परिस्थितीत हे पब्ज चालवले जात होते, ते टाळलं असतं तर ही जीवितहानीही टाळता आली असती, असं निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.

'मोजोस् ब्रिस्टो'चे संचालक युग पाठक, युग टुली, 'वन अबव्ह' संचालक क्रिपेश संघवी, अभिजीत मानकर यांच्याविरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआरटीपी अंतर्गत पालिकेने हा एफआयआर दाखल केला होता. तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील यांनाही अटक करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच युग टुलीचाही जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

29 डिसेंबरच्या रात्री कमला मिल कम्पाउंड मधील 'वन अबव्ह' आणि 'मोजोस् ब्रिस्टो' या रेस्टोबारना लागलेल्या आगीत गुदमरुन 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

क्रिपेश संघवी, जिगर संघवी, अभिजीत मानकर, युग टुली आणि युग पाठक यांच्यावर सदोष मनुष्यवध, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, दुसऱ्याच्या जीवितास कारणीभूत, अग्निविरोधक यंत्रणेचा वापर न करणं या आरोपांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.