मुंबई : कमला मिलमधील अग्नितांडवानंतर मुंबई महापालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. स्थानिक महापालिका अधिकाऱ्यांची पब मालकांसोबत हातमिळवणी असल्याचा आरोप अगोदर झाला. आता चक्क मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्यावरही शंका उपस्थित केली जात आहे.


अजोय मेहता यांनी नियमांकडे कानाडोळा करत कमला मिल कम्पाऊंडमध्ये एकाच इमारतीत 18 हॉटेलांना मंजुरी दिली, असा आरोप समाज सेविका आणि वकील आभा सिंह यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून अग्निकांडाच्या चौकशी समितीतून त्यांना वगळण्याची मागणीही केली आहे.

घटनेनंतर मुंबई महापालिकेने पाच अधिकाऱ्यांचं निलंबन तर केलं. मात्र महापालिका प्रशासनावरील आरोप सुरुच आहेत. त्यामुळे महापालिकेनेही कारवाईचा धडाका लावला आहे. घटना घडली तेव्हापासून आतापर्यंत महापालिकेने शहरातील 500 हून अधिक अनधिकृत पब आणि हॉटेल्सवर कारवाई केली आहे. शिवाय इतर हॉटेलांना नियमांची पूर्तता करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे.

हॉटेल आणि पबमध्ये नियमांमध्ये अनधिकृतपणे फेरबदल आणि अनधिकृत बांधकामांना परवानगी दिल्याप्रकरणी महापालिकेच्या 100 पेक्षा जास्त अधिकारी आणि अभियंत्यांची चौकशी होऊ शकते. तर या प्रकरणाची चौकशी केंद्रीय एजन्सीकडून व्हावी, अशी मागणी करणारी जनहित याचिकाही हायकोर्टात दाखल झाली आहे.

मुंबई पोलिसांनी या घटनेनंतर पबच्या दोन मॅनेजरला अटक केली आहे. मात्र पबचे मालक अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत, ज्यांचा शोध सध्या घेतला जात आहे.