कल्याण : कल्याणमधील वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला पत्री पूल धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. सुरक्षा ऑडिटमध्ये ही माहिती समोर आल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करुन लवकरात लवकर पाडण्याच्या सूचना मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिल्या आहेत.


मध्य रेल्वे, आयआयटी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेतर्फे 20 जुलैला पत्री पुलाचं सेफ्टी ऑडिट करण्यात आलं होतं. त्यानंतर पादचारी किंवा वाहनांच्या वाहतुकीसाठी हा पूल सुरक्षित नसल्याचं समोर आलं.

या मार्गावरील वाहतूक तातडीने बंद करण्याचे आदेश मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेला दिले. याची तारीख आणि वेळ अद्याप ठरलेली नाही.

पादचारी किंवा कोणतीही गाडी या मार्गाचा वापर करु शकणार नाहीत. वाहतूक बंद केल्यानंतर लवकरात लवकर पूल पाडण्याची तयारी करण्यासही रेल्वे प्रशासनाने महापालिकेला सांगितलं आहे.

कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा पत्री पूल हा पादचारी आणि वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे वाहतुकीवर याचा गंभीर परिणाम होईल. कल्याण डोंबिवली परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे.