Kalyan Leopard News : कल्याण पूर्वेतील नागरिकांसाठी आजचा दिवस चांगलाच दहशतीचा ठरला. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा काटेमानवली परिसरातील श्रीराम अनुग्रह इमारतीमध्ये चक्क बिबट्या शिरला. त्याआधी त्याने दोन जणांवर हल्ला केल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. या बिबट्याने आधी एका व्यक्तिवर हल्ला केला, त्यानंतर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या रेस्क्यू टीममधील प्राणी मित्रावर देखील बिबट्याने हल्ला केला. अखेर वनविभाग, पोलीस, संजय गांधी उद्यान रेस्क्यू पथक अग्निशमन विभाग, प्राणी मित्र संघटनेच्या 10 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. तब्बल दहा तास रेस्क्यू यंत्रणेसह नागरिकांना देखील या बिबट्याने वेठीस धरलं होतं. बिबट्या जेरबंद झाल्यानंतर कल्याणमधील नागरिकांनी देखील सुटकेचा श्वास सोडला..


कल्याणमध्ये आज सकाळच्या सुमारास एकच खळबळ उडाली. कल्याण पूर्व काटेमानवली परिसरातील श्रीराम अनुग्रह इमारतीमध्ये एक वाट चुकलेला बिबट्या शिरला. बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. याच दरम्यान बिबट्याने दोन जणांवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं.  या घटनेची माहिती मिळताच कल्याण वन विभागाचे पथक, कोळशेवाडी पोलीस आणि अग्निशामक दलही आले. 


इमारतीमध्ये दबा धरून बसलेला बिबट्याच असल्याची खात्री झाल्यानंतर बिबट्याच्या सुटकेसाठी ठाणे वनविभाग, कल्याण वन विभाग, बदलापूर वनविभाग तसेच संजय गांधी उद्यान रेस्क्यू टीम, वॉर प्राणीमित्र संघटना, पॉज प्राणी मित्र संघटना घटनास्थळी दाखल झाले. इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर बिबट्या असल्याचे लक्षात आल्यानंतर रेस्क्यू टीमने इमारतीला तिन्ही बाजूंनी जाळ्या लावल्या. 


या बिबट्याला खाली उतरवण्यासाठी फटाके फोडले, दरवाजे ठोठावण्यात आले. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.  मात्र काही केल्या बिबट्या खाली येत नव्हता. अखेर डार्ट गणची मदत घेण्यात आली. कल्याण ठाणे वनविभाग,  बोरिवली नॅशनल पार्कचे  सहाय्यक वन अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील पथक, वॉर आणि पॉज संस्थेच्या रेस्क्यू कर्मचाऱ्यांसह आजूबाजूच्या परिसरातील रेस्क्यू टीमचे 60 ते 70 पेक्षा जास्त लोकांचे पथक सकाळपासून बिल्डिंगभोवती दबा धरून बसले होते. वन विभागाचे अधिकारी 6 डार्ट गनच्या मदतीने बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. 


बिल्डिंगच्या प्रत्येक प्रवेश द्वारावर रेस्क्यू टीमने 10 तास खडा पहारा दिला. प्रवेश द्वार जाळी लावून बंदिस्त करण्यात आले होते.  कधी इमारतीच्या छतावर तर कधी पहिल्या मजल्यावरील खिडकीतून इमारतीत उतरत  बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु होते. दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास बिबट्याला गनच्या मदतीने टीम लीडर दिनेश गुप्ता यांनी बिबट्याला जायबंदी करण्याच्या प्रयत्न केला. मात्र बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांच्या चेहरा आणि हाताला ओरखडे उमटले. तर यावेळी संरक्षक जाळी पकडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता हर्षल साळवी यांच्या हातावर देखील बिबट्याच्या नखाचा वार झाल्याने ते ही जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र रेस्क्यू टीमने हार मानली नाही, पुन्हा प्रयत्न सुरू केले. अखेर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास तब्बल 10 तासाहून अधिक झुंजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले. डार्ट गनच्या साहाय्याने बिबट्याला बेशुद्ध करण्यात आले आणि बिबट्या जेरबंद झाला. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.