डोंबिवली: डोंबिवलीतील संदप खदाणीमध्ये पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर अखेर महापालिकेला जाग आली आहे. या खदाणीच्या ठिकाणी आता टाकी आणि हौदाची निर्मिती करण्यात येणार असून त्या ठिकाणी कायमस्वरुपी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येणार आहे.


संदप गावातील खदाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता .या दुर्दैवी घटनेनंतर या गावांना भेडसावणाऱ्या पाणी समस्येबाबत महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. घटनेच्या तिसऱ्या दिवशी महापालिका अधिकाऱ्यांनी या खदाणीची पाहणी केली. त्यानंतर खदाणीतून पाणी बाहेर काढून सुमारे पाच ते दहा हजार लिटर क्षमतेच्या टाक्यामध्ये पंपिंग करुन भरण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत होईर्पयत 15 एमएलडी पाणी वाढवून द्यावे अशी मागणी एमआयडीसीकडे करण्यात आली आहे.


पाणी टंचाईमुळे खदाणीत कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा खदाणीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना डोंबिवली संदप गावात घडली होती. या दुर्दैवी घटनेनंतर जवळ असलेल्या पोपर देसले पाडा नांदिवली आदी गावांमधील पाणी टंचाईचा प्रश्न प्रकर्षाने समोर आला होता. पाणी समस्या बाबत या गावातील नागरिकांनी अनेकदा मोर्चे काढले, आंदोलनं केली, निवेदनं दिली. मात्र पाणी समस्या काही मार्गी लागत नव्हती. 


अखेर या दुर्दैवी घटनेनंतर महापालिका प्रशासनाला जाग आली असून या गावांच्या निर्माण झालेल्या पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. आज केडीएमसीच्या अधिकाऱ्यांनी या खदाणीची पाहणी केली. संदप खदाणीमधील पाणी बाहेर काढून सुमारे 5000 ते 10000 लिटर क्षमतेच्या टाकीमध्ये /हौदामध्ये पंपिंग करुन भरण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे सदर पाणी आजूबाजूच्या परिसरातील महिला कपडे धुणे व इतर कामासाठी वापरू शकतील. एमआयडीसीकडून 27 गावांना पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा कमी प्रमाणात आणि कमी दाबाने होत असल्यामुळे, अमृत योजना कार्यान्वित होईपर्यंत आणखी 15 एम.एल.डी. पाणी वाढवून दयावे, अशी मागणी एमआयडीसीकडे करण्यात आली आहे.


मानपाडा संप येथून पंपाने पाणी भोपर, देसलेपाडा आदी पाण्याची टंचाई असलेल्या ठिकाणी पोहचवण्याबाबत टेंडर मागविण्यात आले असून, त्याबाबत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संदपमध्ये घडलेल्या दुदैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सदर खदानीभोवती महापालिकेच्या अग्निक्षमन विभागामार्फत जीवरक्षकांची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे माहापालिकेतर्फे सांगण्यात आले.