मुंबई:  राज्यासह मुंबईतील गुन्हेगारीचं प्रमाण वाढतच आहे. मुंबईत गेल्या पाच वर्षात बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. तर छेडछाडीच्या घटना 165 टक्क्यांनी वाढल्या आहेत. माहिती अधिकारात मुंबई पोलिसांनीच याबाबतची आकडेवारी दिली आहे.


मुंबईत 2012-13 मध्ये बलात्काराच्या 294, तर छेडछाड, विनयभंगाच्या 793 घटना घडल्या होत्या. त्यानंतर पाच वर्षात या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

2016-17 च्या आकडेवारीनुसार मुंबईत बलात्काराच्या 576 तर विनयभंगाच्या 2,103 घटना घडल्या आहेत. धक्कादायक म्हणजे 72 टक्के बलात्कार पीडित मुली या अल्पवयीन आहेत.

प्रजा या एनजीओने माहिती अधिकारात ही माहिती मिळवली.

मुंबईत पाच वर्षात बलात्काराच्या घटनांमध्ये दुपटीने वाढ झाली असली, तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये घट झाली आहे. कारण 2012-13 मध्ये बलात्काराच्या 294 घटना घडल्या होत्या, तर 2015-16 मध्ये हा आकडा 728 वर पोहोचला होता. मात्र 2016-17 मध्ये त्यामध्ये घट होऊन तो 576 वर पोहोचला.

खुनाचं प्रमाण घटलं

त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे खुनाचं प्रमाण 30 टक्क्यांनी घटलं आहे. शिवाय सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्येही 72 टक्क्यांनी कपात झाली आहे.

पार्ले, वांद्रे, कुर्ल्यात गुन्हे वाढले

मुंबईत दररोज 40 पेक्षा जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदले जातात. उत्तर मध्य मुंबईतील विले पार्ले, कुर्ला आणि वांद्रे या भागातील गुन्ह्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

याच भागात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. एप्रिल 2016 ते मार्च 2017 या काळात जवळपास बलात्काराचे 149 गुन्हे या भागात नोंदवण्यात आले.

अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बलात्काराच्या घटना वाढल्या असतानाच, त्यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे, बलात्कार पीडित बहुसंख्य मुली या अल्पवयीन आहेत. 2016 मधील आकडेवारीनुसार अल्पवयीन बलात्कार पीडित मुलींचं प्रमाण हे 72 टक्के इतकं आहे.

म्हणजेच 10 पैकी सात गुन्ह्यातील पीडित मुली या अल्पवयीन आहेत.

2015 मध्ये लैंगिक शोषण झालेल्या स्त्रीयांमध्ये 43 टक्के मुली या 12 ते 16 वयाच्या होत्या. त्यामुळे मुंबईत अल्प किंवा किशोरवयीन मुलींची सुरक्षितता धोक्यात असल्याचं प्रजा एनजीओच्या संस्थापिका निता मेहता यांनी म्हटलं आहे.