Kala Ghoda Art Festival : कला, क्राफ्ट, सिनेमा, नाटक, नृत्य, संगीत यासह अनेक कलाकृतींची रेलचेल असणाऱ्या काळा घोडा कला महोत्सवाचे पंख आता आणखी विस्तारणार आहेत. मुंबईच्या इतिहासात काळा घोडा कला महोत्सवाचे खूपच महत्वाचे स्थान आहे. विविध कलांचा अनोखा मेळ घालणारा काळा घोडा कला महोत्सव पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आणखी भव्य स्वरुपात आणि मोठ्या विस्तारात आयोजित केला जाणार आहे.


आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत जगातील सर्वात मोठ्या बहुसांस्कृतिक महोत्सवांपैकी एक असलेला काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल (KGAF) त्याच्या डिजिटल अवतारासह जागतिक झाला होता आणि नऊ दिवसांमध्ये 70 हून अधिक ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आता फेब्रुवारी 2022 मध्ये काळा घोडा आर्ट फेस्टीव्हल KGAF एका नव्या  'उडान' थीमसह ररिकांच्या भेटीला येणार आहे. 


या वर्षी रस्त्यांवर स्टॉल्स उभारले जाणार नसल्याने ग्राउंड इंस्टॉलेशन्स अत्यल्प आहेत. यात उडान या थीमला अनुसरून, डेकोर लाइटिंगने भरलेले बहुतेक एरियल व्हिज्युअल आर्ट्स इंस्टॉलेशन्स असतील.  काही इमारतींच्या दर्शनी भागावर भित्तीचित्रे रंगवली गेली आहेत. KGAF यावर काम करीत असून ही भित्तीचित्रे या नियमित परिसराच्या पलीकडेही असणार आहेत.कोविड प्रोटोकॉल लक्षात घेऊन,  वॉक-इन टाळण्यासाठी नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. तसेच सामाजिक अंतर कायम ठेवणेही आवश्यक आहे. दुहेरी लसीकरण प्रमाणपत्रे तपासून प्रवेश दिला जाणार असून  पालकांसोबत प्रवास करणाऱ्या मुलांसाठी आरोग्य सेतू अॅप तपासले जाईल. 


काळा घोडा फेस्टीव्हलमध्ये कार्यशाळा, हेरिटेज वॉक आणि पथनाट्य तसेच व्हिज्युअल आर्ट इन्स्टॉलेशन, साहित्य, नाट्य, सिनेमा, संगीत आणि नृत्य कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या कला महोत्सवात आयोजित केले जाणारे सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. क्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तूंच्या साक्षीनं हा कलेचा उत्सव पाहण्यासाठी मुंबईसह भारतातीलच नाही; तर जगभरातून रसिक येतात. पुढचा आठवडाभर कलेच्या उपासकांसह रसिकांसाठीही ही मोठी पर्वणी असणार आहे.


संबंधित बातम्या


काळा घोडा फेस्टिव्हल दरम्यान क्रॉस मैदानावर केवळ सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी