मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी कोलकता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावर शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडून दत्ता यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.


मुंबई उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी हे येत्या 27 एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. आजवरचा इतिहास पाहता मुंबई उच्च न्यायालयावर बाहेरच्या राज्यातून मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमणूक करण्याचीच प्रथा आहे. अपवाद निवृत्त न्यायमूर्ती सुजाता मनोहर आणि निवृत्त न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यानंतर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांचा ज्यांची इथंच मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


24 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाच्या कोलीजिअम म्हणजेच न्यायवृंदाच्या बैठकीत न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांची 23 फेब्रुवारीलाच मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे 24 तासाच्या आतच त्यांनाच या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बनवण्यासाठीची शिफारस करण्याचा एक ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या कोलिजिअमनं घेतला होता.


कोण आहेत दीपांकर दत्ता?


दीपांकर दत्ता हे कोलकाता उच्च न्यायालयाचे दिवंगत माजी न्यायमूर्ती सलीलकुमार दत्ता यांचे चिरंजीव आहेत. साल 1989 मध्ये एलएलबी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या वकिलीला सुरुवात केली. मुख्यत्वे कोलकाता उच्च न्यायालयात अनेक वर्षे त्यांनी वकिली केली आहे. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालय व अन्य राज्यांतील उच्च न्यायालयांतही त्यांनी राज्यघटना व कायद्यांच्या महत्त्वाच्या प्रकरणांत युक्तिवाद मांडले आहेत. त्यांनी केंद्र व राज्य सरकारसाठी काही वर्षे सरकारी वकील म्हणून काम केले. कोलकाता विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विधी महाविद्यालात व्याख्याता म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम केलं आहे. २२ जून २००६ पासून म्हणजेच सुमारे १४ वर्षांपासून कोलकाता उच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदावर न्यायदानाचे काम करत आहेत.