High Court On Jitendra Navalani : जितेंद्र नवलानी यांना दिलासा देत त्यांच्याविरोधात मारहाण आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याचे आदेश हायकोर्टानं जारी केले आहेत. 23 नोव्हेंबर 2019 मध्ये गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवलानी यांच्याच हॉटेलात झालेल्या एका हाणामारीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला होता. नवलानी यांनी त्यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील राखून ठेवलेला आपला निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडली होती. हे तेच जितेंद्र नवलानी आहेत ज्यांच्याविरोधात शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नवलानी हे ईडीचे वसुली एजंट असल्याचा दावा केला होता.


मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत हा गुन्हा दाखल करून आपल्याला यात गोवल्याचा नवलानी यांचा आरोप होता. तर  हे निव्वळ एका हाणामारीचं प्रकरण नाही, तर यात एका पोलीस अधिकाऱ्यावर हात उगारत त्याला त्याचं कर्तव्य बजावण्यापासून रोखल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं स्पष्ट करत राज्य सरकारनं हा गुन्हा रद्द करण्यास विरोध केला होता. मात्र हाणामारीच्या याच प्रकरणी दाखल गुन्ह्यातनं नवलानी यांचं नाव हटवण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दबाव टाकल्याचा आरोप तक्रारदार पोलीस अधिकाऱ्यानं केला आहे. याशिवाय या सुनावणी दरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्तांनी यात सादर केलेला चौकशी अहवाल हा नवलानी यांना वाचवण्यासाठीच दाखल केल्याचा खळबळजनक आरोपही राज्य सरकाच्यावतीनं हायकोर्टात करण्यात आला होता. 


कोण आहेत जितेंद्र नवलानी 


संजय राऊत यांनी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र नवलानी यांचं नावाचा उल्लेख होता. ईडीकडे येणाऱ्या प्रकरणांतील वसूली एजंट असं राऊतांनी नवलानींचं वर्णन केलं होतं. याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासोबत नवलानी यांचं नाव पहिल्यांदा जोडलं गेलं होतं. परमबीर सिंह यांचे निकटवर्तीय असल्यानं याच गुन्ह्यातून नवलानी यांचं नाव हटवण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तक्रारदार पोलीस अधिकारी अनूप डांगे यांनी केला होता. जेव्हा तसं करण्यास नकार दिला तेव्हा आपली बदली करण्यात आली आणि नंतर ही बदली रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांच्यावतीनं 2 कोटींची लाच मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणावरून परमबीर सिंह आणि रेस्टॉरंट बार मालकांचे जवळचे संबंध असल्याचा आरोपही झाला होता.


नेमकं काय घडलं होतं 'त्या' रात्री 


23 नोव्हेंबर 2019 च्या रात्री जितेंद्र नवलानी यांचा वाढदिवस होता. हा वाढदिवस ते 'डर्टी बन्स' या स्वत:च्या मालकीच्या रेस्टॉरंट अँड बारमध्ये आपल्या मित्रपरिवारासोबत साजरा करत होते. रात्रीचे दोन वाजले तरी हॉटेल सुरूच असल्यानं रात्रपाळीवर असलेले अनुप डांगे तिथं बार बंद करण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी त्यांची तिथं बातचीत सुरू असताना अचानक तिथल्या लिफ्टमध्ये काहीजणांत आपापसात हाणामारी सुरू झाली. ज्यात काही महिलांसह एकूण सहा जणांचा समावेश होता. एफआयआर मध्ये नोंदवलेल्या माहितीनुसार रोहन, योहान साची मेकर, इसराम मुन्नार यांच्यात हाणामारी सुरू होती. ती सोडवण्यासाठी अनूप डांगेमध्ये पडले असता, त्या महिलेनं डांगे यांना शिविगाळ करत त्यांच्यावर हल्ला चढवला. यामध्ये डांगे यांचा युनिफॉर्म फाटला. तिथेच उपस्थित असलेल्या संतोष जहांगीर यानं अचानक मध्ये घुसत हाणामारीला सुरूवात केली. यात डांगे यांनाही मार बसला. त्यानंतर जितेंद्र नवलानी यांनी मध्ये पडत सर्वांना तिथून बाजूला केलं आणि निघून जाण्यास सांगितलं. मात्र डांगे जेव्हा जहांगीर याला पकडण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा नवलानी यांनी त्यांना अडवलं आणि जहांगीरला तिथून पळून जाण्यास मदत केली असा पोलिसांचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं या सर्वांविरोधात गुन्हा दाखल केला.


त्यापैकी रोहन आणि योहान यांना त्या रात्रीच पोलीसांनी जागेवर जामीन मंजूर केला. साची मेकर आणि इसराम मुन्नार यांनी कोर्टानं अटकपूर्व जामीन मंजूर केला. तर फरार संतोष जहांगीर उर्फ सत्यालानंतर अटक करण्यात आली. मात्र त्यालाही कोर्टानं जामीन मंजूर केला होता. 14 डिसेंबर 2021 रोजी मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे जीतेंद्र नवलानी यांनी गुन्हा रद्द करण्याऐवजी दोषमुक्तीची याचिका दाखल करायला हवी असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अरूणा पै कामत यांनी हायकोर्टात केला. मात्र एप्रिल 2020 मध्ये पोलीस उपायुक्तांनी दाखल केलेल्या अहवालात मात्र या संपूर्ण प्रकरणात जीतेंद्र नवलानी यांना क्लीन चीट देण्यात आल्याचा दाखला त्यांच्यातर्फे जेष्ठ वकील आभात पोंडा यांनी हायकोर्टात केला होता.