मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची घेतलेली भेट वैयक्तिक होती, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे. दोन माणसांच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्या म्हणून ते भेटू शकत नाही का? असा सवाल आव्हाडांनी केला. राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी आव्हाडांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
2014 ला समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न सुरु होता, 2019 ला काही वेगळी समीकरणं जुळतील का? असा प्रश्न आव्हाडांना विचारला असता 'हवेची दिशा सांगता येते पण राजकारणाची सांगता येणार नाही, मी ज्योतिषी नाही' असं सूचक वक्तव्य आव्हाडांनी केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा निरोप घेऊन गेला होतात का? असा सवाल जितेंद्र आव्हाडांना करण्यात आला. 'मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. त्यांचा निरोप मी काय घेऊन जाणार? माझं वैयक्तिक काम होतं, म्हणून मी गेलो होतो' असं उत्तर आव्हाडांनी दिलं. 'मातोश्री'वर दोघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा रंगली.
जितेंद्र आव्हाड हे विरोधी पक्ष अर्थात राष्ट्रवादीचे आक्रमक नेते आहेत. त्यांनी सातत्याने शिवसेना-भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. विशेषत: शिवसेनेच्या भूमिकेवर ते नेहमीच सडकून टीका करतात. शिवाय सामनातूनही आव्हाडांवर बोचरे वार केले जातात. मात्र तेच जितेंद्र आव्हाड आज ‘मातोश्री’वर गेल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
आघाडीत मनसेला सामावून घेण्याचा विचार सुरु असून या भेटीनंतर वेगळं काही पाहायला मिळू शकतं? असं आव्हाडांना विचारण्यात आलं. 'फॅसिझम जावा, हा आम्हा सर्वांचा हेतू आहे. सामनामधून वेळोवेळी इशारे दिले जात आहेत, पण गटबंधन किंवा महाआघाडी हे माझ्या अवाक्याबाहेर आहे. पण माझी इच्छा आहे' असे संकेतही आव्हाडांनी दिले.
उद्धव ठाकरेंशी अनेक विषयांवर चर्चा झाली, पण ते जाहीररित्या सांगणं योग्य नसल्याचंही आव्हाड म्हणाले. आव्हाडांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट पवारांना आवडेल का? असा प्रश्न विचारला असता 'हे माझं वैयक्तिक आयुष्य आहे. माझं पक्षावरचं आणि पवार साहेबांवरचं प्रेम इतकंही पातळ नाही.' असं आव्हाड म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची बैठक नियोजित आहे. मात्र त्या बैठकीला जाण्यापूर्वी आव्हाड हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहचले. जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांच्या जवळचे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीच्या दृष्टीने काँग्रेसशी चर्चा सुरुच आहे. शिवाय भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याबाबतची भूमिका पवारांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे.
हवेची दिशा सांगता येते, राजकारणाची नाही, 'मातोश्री' भेटीनंतर आव्हाडांचं उत्तर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Oct 2018 03:05 PM (IST)
राष्ट्रवादीच्या बैठकीपूर्वी आव्हाडांनी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -