शिवडीतल्या झगडे कुटुंबाची 10 बाय 10 ची खोली आनंदानं उजाऴून निघाली आहे. शिक्षणाच्या दिव्याचा प्रकाश घरभर पसरला आहे. झगडे कुटुंबातील आई आणि लेक दोघीही एकाचवेळी दहावीची परीक्षा चांगल्या मार्कांनी पास झाल्या आहेत.
शिक्षणाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. चौथीत असताना शाळा सुटलेल्या सरिताताईंनी हेच पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. वयाच्या 45 व्या वर्षी इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर यशाची पायरी सर केली आहे.
सरिताताईंची मोठी मुलगी क्षितीजाही याच वर्षी 12 वीची परीक्षा उत्तीर्ण झाली. आपला बारावीचा अभ्यास सांभाळून क्षितीजानं आईचा आणि धाकट्या बहिणीचा अभ्यास घेतला.
तीन यशस्वी महिलांमागे एक पुरुष :
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असं सर्वसाधारणपणे म्हटलं जातं. मात्र झगडे कुटुंबातील तीन यशस्वी स्त्रियांच्या पाठीशी एक पुरुष आहे. आपली पत्नी आणि मुलींच्या पाठीशी उभे राहिले ते विश्वनाथ झगडे.
सरिताताईंना अभ्यासाचं वेळापत्रक सांभाळता यावं म्हणून घरातल्या कामातही हातभार लावणाऱ्या विश्वनाथ झगडेचं कौतुक करावं तेवढं थोडचं आहे. सरिताईंनी आता आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी आणखी यशाची शिखरं पादाक्रांत करावी हीच सदिच्छा.