मुंबई : मुंबईतील व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्या प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारला अटक करण्यात आली आहे. घाटकोपरमधले दागिन्यांचे व्यापारी राजेश्वर उदानी यांचा मृतदेह पनवेलच्या जंगलात आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

57 वर्षीय राजेश्वर उदानी 28 नोव्हेंबरपासून बेपत्ता होते. उदानींच्या नातेवाईकांनी पंतनगर पोलिस ठाण्यात उदानी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर 4 डिसेंबरला पनवेल पोलिसांना नेरे गावातील जंगलात एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह व्यापारी राजेश्वर यांचाच असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी काल कपडे आणि बेल्टवरुन ओळखलं.

आरोपी सचिन पवार

पोलिसांनी यापूर्वी काही बारबाला आणि प्रकाश मेहता यांचा माजी सचिव सचिन पवारची चौकशी केली होती. अपहरणानंतर राजेश्वर उदानींची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर सचिन पवारला शनिवारी बेड्या ठोकण्यात आल्या. विशेष म्हणजे एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचीही या प्रकरणात चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहे सचिन पवार?

- सचिन पवार हा 2009 मध्ये भाजपचा बूथ प्रमुख होता
- 2012 मध्ये अपक्ष म्हणून महापालिका निवडणूक लढला. त्यानंतर त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली
- 2017 महापालिका निवडणुकीत पत्नी साक्षी पवारला भाजपमधून तिकीट मिळालं
- पत्नीच्या उमेदवारीनंतर सचिन पवारची भाजपमध्ये घरवापसी
- सध्या सचिन पवार पक्षात आहे, पण कोणत्याही पदावर नाही

सचिन पवारशी संबंध नाही - मेहता

घाटकोपरमध्ये एका उद्योजकाच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सचिन पवार आणि माझा कशाही प्रकारे संपर्क आणि संबंध नाही. 2004 ते 2009 या कालावधीत तो माझ्याकडे  सहाय्यक म्हणून काम करत होता. परंतु त्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढल्यामुळे पक्षाने त्याच्यावर कारवाई करत त्याला पक्षातून काढून टाकले. तेव्हापासून आजपर्यंत या व्यक्तीशी माझा संपर्क आलेला नाही. या 9 वर्षात पक्ष स्तरावर आणि कर्मचाऱ्याच्या स्वरुपात सुद्धा माझा त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क नाही. आताही तो माझा सहाय्यक नाही. अशा परिस्थितीत सचिन पवारसोबत माझं नाव जोडणं अत्यंत चुकीचं आहे. मुंबई पोलिस देशातील एक सक्षम यंत्रणा आहे. म्हणून मला वाटतं की पोलिस उपायुक्त जलदगतीने अधिक योग्य कारवाई करून गुन्हेगाराला जास्तीत जास्त शिक्षा मिळवून देतील, अशी प्रतिक्रिया गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली आहे.