मुंबई : कोरोना व्हायरसचं संकट रोखण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आज आंदोलन केलं. मात्र राज्य सरकार काम करत असून महाराष्ट्रात सर्वाधिक टेस्टिंग सुरु असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं. सोबतच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
जयंत पाटील म्हणाले की, "राज्य सरकार काम करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देशातील इतर राज्यात फिरुन यावं मग कळेल राज्यात किती काम सुरु आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त टेस्टिंग सुरु आहे म्हणून रुग्ण दिसत आहेत. इतर राज्यात टेस्टिंग कमी होत आहे."
केंद्राच्या पॅकेजमधील फोलपण फडणवीसांना दिसला
केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसंच सरकारने राज्यातील जनतेला दमडीही दिली नाही, अशी टीका केली होती. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, "केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते पॅकेजची मागणी करत आहेत." शिवाय "केंद्राने राज्याला पैसे दिले याबाबत देवेंद्र फडणवीस यांना काहीतरी गैरसमज झाला आहे," असा टोलाही लगावला.
भाजपच्या 'माझं अंगण रणांगण' आंदोलनाला महाविकास आघाडीकडून 'महाराष्ट्रद्रोही BJP' ट्रेंडनं उत्तर
पंतप्रधान मोदी तरी कुठे बाहेर गेले?
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाहीत, अशी टीका केली होती. त्यालाही जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. "चंद्रकांत पाटलांना आधी पण सल्ला दिला की घराबाहेर पडू नका. लॉकडाऊन आहे. सगळे जण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तरी कुठे बाहेर गेले? त्यामुळे चंद्रकांतदादा ऐकतील, असा विश्वास आहे," असं जयंत पाटील म्हणाले.
भाजपचं घराच्या अंगणात आंदोलन
कोरोनाच्या संकटात राज्य सरकार अपयश ठरल्याचा आरोप करत भाजपने आज आंदोलन केलं. 'माझं अंगण माझं रणांगण', 'महाराष्ट्र बचाओ' अंतर्गत सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत हे आंदोलन हे निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप नेत्यांनी काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला.
महाविकास आघाडीचं भाजपविरोधात सोशल मीडिया आंदोलन
दुसरीकडे महाविकास आघाडीने भाजपविरोधात सोशल मीडियावर आंदोलन सुरु केलं. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रद्रोही भाजपा हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आहे. भाजपच्या आंदोलनाविरोधात पहिल्यांदा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सोशल मीडियावर एकत्र आले. हा हॅशटॅग सध्या देशात तिसऱ्या क्रमांकावर ट्रेण्डिंगमध्ये आहे.
Devendra Fadnavis | कोरोना रुग्णांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत, सरकारबद्दल जनतेत असंतोष : देवेंद्र फडणवीस