फडणवीस म्हणाले की, सरकारबद्दल जनतेत असंतोष आहे. राज्यात कोरोना रुग्णांना उपचार व्यवस्थित होत नाहीत. केवळ रूग्णवाहिका नाही, म्हणून अनेकांचे मृत्यू होत आहेत. रूग्णसंख्या 40 हजारावर गेली असताना आरोग्यसेवेकडे अजूनही सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, तर पुढचे परिणाम अतिशय गंभीर असतील. अॅम्ब्युलन्स मिळत नाहीत. बेड मिळत नाहीत. महाराष्ट्र आणि मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला आहे. याचा मुकाबला करण्याची सरकारची तयारी नाही, असं फडणवीस म्हणाले.
हेही वाचा- भाजपच्या 'माझं अंगण रणांगण' आंदोलनाला महाविकास आघाडीकडून 'महाराष्ट्रद्रोही BJP' ट्रेंडनं उत्तर
फडणवीस म्हणाले बीकेसी सारखं सेंटर दोन दिवसात भरून जाईल. पाऊस पडल्यावर बीकेसी सेंटरचं काय होईल? असा सवाल त्यांनी केला. केंद्राने 20 लाख कोटींचे पॅकेज घोषित केले पण राज्याने एक दमडीचे पॅकेज दिले नाही, असंही ते म्हणाले. कर्नाटक,मध्य ओदिशा, गुजरात, छत्तीसगडने योजना जाहीर केली. पण एक नवा पैसा राज्य सरकार खर्च करायला तयार नाही, असंही ते म्हणाले. राज्य सरकारला अॅडव्हान्समध्ये 3800 कोटी रुपये दिले आहेत. 1600 कोटी मजुरांचे कॅम्प आणि खाण्याची व्यवस्था करण्यासाठी दिले. यातील एक पैसे खर्च केला नाही, असंही फडणवीस म्हणाले. मोफत रेशन केंद्राने दिले असल्याचंही त्यांनी सांगितलं.
खरीप हंगाम आहे शेतकऱ्यांकडे माल पडला आहे. कापूस, चण्यासह शेतीमाल घरी आहे. शेतकरी हवालदिल आहे. जी खरेदी होते आहे त्याचे पैसे केंद्र देत आहे. पण राज्य खरेदी करत नाही. शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार अडचणीत आहेत, असंही फडणवीस म्हणाले. आमचे पोलिस बांधव तर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना त्यातील सुमारे 1400 पोलिसांना लागण, त्यांच्याही उपचारांची काळजी नाही. अतिशय वेदनादायी चित्र आहे, असं ते म्हणाले.
आज भाजपने महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू केले. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घराच्याबाहेर उभं राहून काळ्या फिती, काळे झेंडे, रिबन आणि फलक उंचावून सरकारचा निषेध नोंदवला गेला. दुसरीकडे महाविकास आघाडीनं भाजपविरोधात सोशल मीडियावर आंदोलन सुरु केलंय. महाराष्ट्र कोरोनाच्या संकटाला मोठ्या धीराने सामोरे जात असताना भाजप गलिच्छ राजकारण करत असल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रद्रोही भाजपा हा ट्रेंड ट्रेंडिंगमध्ये आहे.