मुंबई : प्रत्येक पावसाळ्यात मुंबई शहराची तुंबई होते. तुंबलेल्या पाण्यामुळे ठिकठिकाणी रस्ते, रेल्वेमार्ग बंद होतात. यावरील उपायांबाबत चर्चा करण्यासाठी आज महापालिका आयुक्तांसोबत जपानच्या तंत्रज्ञांची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत जपानची राजधानी टोकियोमधील अधिकारी व तंत्रज्ञांनी विशेष सादरीकरण केले. हे तंत्रज्ञ उद्या महापालिका क्षेत्राचा अभ्यास दौरा करुन अहवाल सादर करणार आहेत.
जपानमधील टोकियो शहरात जमिनीखाली मोठे मोठे जलबोगदे तयार करुन त्यात पावसाचे साचलेले पाणी साठवून नंतर ते समुद्रात सोडण्याची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. याच प्रकारची उपाययोजना मुंबईत राबवता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याबाबत आज महापालिका मुख्यालयात जपानमधील संबंधित संस्थेचे अधिकारी आणि तंत्रज्ञ यांनी विशेष सादरीकरण केले. हे तंत्रज्ञ उद्या महापालिका अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील तलावांचा, नद्यांचा आणि पाणी साचणाऱ्या परिसरांचा अभ्यास दौरा करुन नंतर त्याविषयीचा अहवाल सादर करणार आहेत.
जपानच्या तंत्रज्ञ/ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
⦁ टोकियो शहरामध्ये पावसाचे साचणारे अतिरिक्त पाणी साठवण्यासाठी जमिनीच्या खाली मोठमोठे जलबोगदे तयार करून त्यामध्ये पाणी साठवण्याची व नंतर हे पाणी समुद्रात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही उपाययोजना अंमलात आल्यानंतर टोकियो शहर पूरमुक्त झाले आहे.
⦁ या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या कामाचा अनुभव असणाऱ्या जपानमधील संबंधित संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि तंत्रज्ञांनी आज महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशींसमोर विशेष सादरीकरण केले. टोकियो शहराच्या धर्तीवर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातदेखील अशा प्रकारची उपाय योजना राबवता येऊ शकते का? या अनुषंगाने चाचपणी करण्याविषयी आजच्या बैठकीदरम्यान प्राथमिक चर्चा झाली.
⦁ टोकियोमध्ये जलबोगद्यात साठवलेले पावसाचे पाणी नंतर समुद्रात सोडले जाते. मात्र, मुंबईत अशा प्रकारचा प्रकल्प राबवावयाचा झाल्यास बोगद्यातील पाणी समुद्रात सोडण्याचा पर्याय खुला ठेवून ते पिण्यासाठी वापरता येऊ शकेल का? याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीत दरम्यान संबंधित तज्ज्ञांना दिल्या आहेत.
⦁ जपानच्या संबंधित संस्थेचे हे तज्ज्ञ उद्या महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पवई, विहार, तुळशी तलाव, मिठी नदी आणि तत्सम भागांचा अभ्यास दौरा करणार आहेत. नंतर या अभ्यास दौऱ्याचा अहवाल ते महापालिकेला सादर करणार आहेत.
⦁ पावसाचे पाणी मोठ-मोठ्या जलबोगद्यांमध्ये साठवण्याचा प्रकल्प मुंबईत राबवायाचा झाल्यास, त्यासाठी 'जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी' (JICA) ची मदत मिळविण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.
मुंबई तुंबण्यावर जपानी उतारा, शहरात जलबोगद्यांच्या निर्मितीचा विचार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Sep 2019 11:14 PM (IST)
जपानमधील टोकियो शहरात जमिनीखाली मोठे मोठे जलबोगदे तयार करुन त्यात पावसाचे साचलेले पाणी साठवून नंतर ते समुद्रात सोडण्याची योजना यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. याच प्रकारची उपाययोजना मुंबईत राबवता येऊ शकते का?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -