मुंबई : रद्द झालेला वाहन परवाना पुन्हा मिळवण्यासाठी जान्हवी गडकरनं परिवहन आयुक्तांकडेच दाद मागावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. 13 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीत जान्हवी गडकरनं आपल्या वकिलांसोबत स्वत: हजर राहून आपली बाजू मांडावी अशी मुभा हायकोर्टाकडून देण्यात आली आहे. तसेच या अपीलावर परिवहन आयुक्तांनी योग्य तो निर्णय घ्यावा असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.


परिवहन आयुक्तांनी सुनावणी न घेताच आपलं अपील रद्द केल्याचा दावा करत जान्हवीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. डी. धनुका यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.


ईस्टर्न फ्रीवेवर मद्यधुंद अवस्थेत उलट्या मार्गिकेत कार चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने वडाळा आरटीओने तिचे लायसन्स रद्द केलं होतं. या आदेशाला दाद मागण्यात एका दिवसाचा उशीर झाल्यानं वेळेत दाद न मागितल्यानं तिचं अपीलही रद्द करण्यात आलं. याला जान्हवी गडकरनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. जान्हवी गडकर सध्या जामीनावर आहे.


काय आहे प्रकरण?
इस्टर्न फ्रीवेवर चेंबूर परिसरात जान्हवी गडकरच्या ऑडी गाडीच्या धडकेत सलीम सबुनवाला आणि सय्यद हुसैन यांचा मृत्यू झाला होता. तर चार जण जखमी झाले होते. सलीम सबुनवाला यांचा मुलगा चांगल्या मार्कांनी दहावी उतीर्ण झाल्याने सेलिब्रेशन करण्यासाठी हा परिवार हॉटेलमध्ये बाहेर जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर एका टॅक्सीतून सबुनवाला यांचा परिवार घराकडे निघाला. त्याचवेळी हा अपघात झाला.


जान्हवी गडकर मद्यपान करुन गाडी चालवत होती, असंही तपासणीत समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी जान्हवीला अटक केली होती. सध्या ती जामिनावर बाहेर आहेत. ऑडी चालवणारी जान्हवी गडकर ही महिला पेशाने वकील आहे.