ठाणे : ठाणे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तात्पुरते उपाय करुनही पुन्हा हे खड्डे वर येत असल्याने आता रेन इन्स्टा या नव्या तंत्रज्ञानानं हे खड्डे बुजवण्यात येणार आहेत.


मुसळधार पावसामुळे ठाण्यातले अनेक महत्त्वाचे रस्ते खड्डेमय झाले होते. या खड्ड्यात तात्पुरती खडी आणि डेब्रिज टाकण्यात येत होतं. मात्र मुसळधार पावसामुळे हे डेब्रिज वाहून जात असल्यानं वाहनचालक आणि पालिका प्रशासानाचीही डोकेदुखी वाढली होती. त्यात पावसाळ्यात पॅचवर्क करण्यासाठी डांबरही वापरता येत नसल्यानं पालिकेच्या अडचणीत भर पडत होती. त्यामुळे पावसातही खड्डे बुजवला यावेत यासाठी रेन इन्स्टा या नव्या तंत्रज्ञानाने आता ठाण्यातले खड्डे बुजवण्यात येणार आहेत.

आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काही रस्त्यांवर या नव्या मटेरियलच्या साहाय्याने खड्डे बुजवण्यात आले. हे तंत्रज्ञान यशस्वी ठरलं, तर ठाणे जिल्ह्यातील सगळ्या महापालिकांमध्ये ते वापरण्यात येईल, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.