Atul Mone Family Pahalgam Attack : काश्मीरमधील पहलगाम येथे कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेलेल्या अतुल मोने यांच्यासह, संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघा डोंबिवलीकर पर्यटकांचा दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात दुर्दैवी मृत्यू झाला होता. अतुल मोने यांच्या कुटुंबीयांनी पहलगाम दहशतवादाची हादरवणारी कहाणी एबीपी माझाशी बोलताना सांगितली आहे. पहलगामला कोणतीच सुरक्षा नव्हती, दोन-तीन चॉपरनं जाऊन माणसांना वाचवायला हवं होतं, असे त्यांनी म्हटले.
अतुल मोने यांची मुलगी म्हणाली की, तिथे आम्ही मिनी स्वित्झर्लंडला होतो. सगळं व्यवस्थित सुरू होतं. लोक एन्जॉय करत होते. फोटोज वगैरे काढत होते. आम्ही निघत होतो तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाला. मला स्वतःला वाटले की नेमकं काय होत आहे? सगळेजण एका दिशेने पळत होते, खाली झोपत होते, मीही तसेच केले. सुरुवातीला त्यांनी दूरवरून गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी लोकांना गोळ्या मारण्यास सुरुवात केली. आम्ही जिथे सगळे एकत्र होतो, तिथे आम्हाला विचारलं की हिंदू कोण आहे? मुस्लिम कोण आहे? माझ्या संजय काकांनी हात वरती केला तर त्यांना डोक्यात गोळी मारली. मी त्यांच्या मागेच होते मी हे सर्व बघितले. नंतर हेमंत काका त्यांना विचारायला गेले की, नक्की काय झाले आहे तर त्यांनाही गोळी मारण्यात आली. त्यानंतर माझे बाबा बोलले की, गोळी मारू नका. आम्ही काही करत नाही. तिथे मी, माझी आई होती. मी खूप घाबरली होती. कारण ते गोळी चालवत होते. आई बाबांना कव्हर करायला गेली. पण, त्यांनी बाबांच्या पोटात गोळी मारली, अशी आपबिती तीने सांगितली आहे.
पहलगामला कोणतीच सुरक्षा नव्हती
हल्ल्यानंतर तिथे लवकर ॲम्बुलन्स पोहोचल्या का? किंवा उपचारासाठी काही प्रयत्न करण्यात आले का? याबाबत विचारले असता अतुल मोने यांच्या पत्नी म्हणाल्या की, आम्ही खाली येत होतो तेव्हा अर्ध्या रस्त्यावर आम्हाला मिलिटरी दिसली. मिलिटरी जे लोक दिसतील त्यांच्याशी बोलत बोलत पुढे जात होते. ते म्हणत होते की, चॉपर वगैरे तिथे गेले आहे. पण, एका चॉपरने काही होत नाही. अजून दोन-तीन चॉपर तिथे जाऊन त्यांनी माणसांना वाचवायला हवे होते, असे आम्हाला वाटते. ते पर्यटन स्थळ असल्याने तिथे सुरक्षा दल हवे होते. तिथे सुरक्षा नव्हती. खाली पोलिसांची सुरक्षा होती. परंतु वरती पर्यटनस्थळी सुरक्षा नव्हती, तिथे सुरक्षा असणे आवश्यक होते, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, त्या ठिकाणी भरपूर गर्दी होती. त्यामुळे किती पर्यटक होते? याबाबतचा अंदाज नाही. पण, जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा सर्वजण तिथून पसरले, असेही त्यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली2) संजय लेले - डोंबिवली3) हेमंत जोशी- डोंबिवली4) संतोष जगदाळे- पुणे5) कौस्तुभ गणबोटे- पुणे6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू2) सुबोध पाटील3) शोबीत पटेल
आणखी वाचा
एकनाथ शिंदेंचा दहशतवादी हल्ल्यानंतर श्रेयवादाचा प्रयत्न, अमित शाहांनी त्यांना समज द्यावी : संजय राऊत