मुंबई महापालिकेच्या मतमोजणीवेळी शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर आणि भाजपच्या अतुल शहा यांना समसमान मतं पडली होती. मात्र ईश्वरचिठ्ठी टाकून निर्णय घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी अतुल शहांना विजयी घोषित केलं होतं. टेंडर वोटिंगची जी मते आहेत त्यांची मोजणी केल्यास विजय हा आमचाच आहे, त्यामुळे टेंडर वोट मोजणीचे आदेश द्यावेत, अशी याचिका सुरेंद्र बागलकर यांनी मुंबईतील लघुवाद न्यायालयात दाखल केली आहे.
या निवडणूकीत पाच टेंडर वोट आहेत. ते न्यायालयासमोर उघडण्याची तरतुद आहे. या टेंडर वोटच्या आधारे निवडणुकीचा निकाल पुन्हा घोषित करण्यात यावा अशी मागणी कोर्टासमोर बागलकरांच्या वकिलांनी ठेवली आहे. मात्र, जरी टेंडर वोटच्या मोजणीनंतर निकाल बागलकरांच्या बाजूनं झुकला, तरी महापौर निवडणूकीसाठी त्याचा फायदा शिवसेनेला होणार नाही. कारण महापौर निवडणूक ही 8 मार्चला आहे तर, टेंडर वोट संदर्भातली न्यायालयाची पहिली सुनावणी ही 20 मार्चला होणार आहे.
दरम्यान या याचिकेत सुरेंद्र बागलकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारी, 222 प्रभागाचे रिटर्निंग अधिकारी, भाजपचे विजयी उमेदवार अतुल शहा आणि इतर उमेदवारांना प्रतिवादी बनवण्यात आलं आहे. मुंबईतील लघुवाद न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता बागलकर यांच्या बाबतीत न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
काय आहे प्रकरण?
23 फेब्रुवारीला झालेल्या मुंबई महापालिकेच्या मतमोजणीत भाजपचे अतुल शहा आणि शिवसेनेच्या सुरेंद्र बागलकर यांना समान मतं पडली होती. त्यानंतर फेरमतमोजणीही करण्यात आली. मात्र फेरमतमोजणीनंतरही दोघांची मतं समान राहिल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ईश्वर चिठ्ठीचा निर्णय घेतला होता.
यावेळी त्याठिकाणी शिवसेनेकडून संजय राऊत, अरविंद सावंत, तर भाजपकडून राज पुरोहित आणि मंगलप्रभात लोढा आदी नेते उपस्थित होते. ईश्वर चिठ्ठीचा निर्णय झाल्यावर दोन्ही उमेदवारांची नावं चिठ्ठीवर लिहून टाकण्यात आली. एका चिमुरडीला मंचावर बोलावून ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली. यात अतुल शहा यांचं नाव विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं.
टेंडर मते म्हणजे काय??
- बुथवरील उमेदवार प्रतिनिधीने एखाद्या मतदाराबाबत आक्षेप घेतला आणि त्या मतदाराकडे मतदान करण्यापुरते पुरावे असल्यास त्या मतदाराला मतपत्रिकेद्वारे मतदान करू दिले जाते.
- म्हणजे त्याला ईव्हीएममध्ये बटण दाबून नव्हे तर स्वतंत्र मतपत्रिका दिली जाते.
- यामध्ये एकाच मतदाराच्या नावाने दुसरा मतदार आला तर त्याचेही मतदान होऊ शकते.
- परंतु हे मतदान मतमोजणीवेळी न मोजता कोर्टात उघडले जाते.
- प्रभाग क्रमांक 220 मध्ये अशी 5 मते आहेत. ही मते मोजण्यात यावीत, यासाठी सेनेचे सुरेंद्र बागलकर कोर्टाचे दार ठोठावणार आहेत.
संबंधित बातम्या :
ईश्वरचिठ्ठी टाकून झालेला निर्णय मान्य नाही, सुरेंद्र बागलकर कोर्टात