मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्वत्र वीज पोहोचल्याचा दावा केला आहे. तर इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य हागणदारी मुक्त झाल्याचं सांगितलं.

मात्र खरंच देशाच सर्वत्र वीज पोहोचली आहे का? आणि महाराष्ट्रही हागणदारीमुक्त झालाय का? याची पडताळणी एबीपी माझाने राज्यभरात केली.

मुंबईजवळचे आदिवासी पाडे

देशाची आर्थिक राजधानी मुंबईपासून हाकेच्या अंतरावर काही आदिवासी पाडे आहेत. मात्र या आदिवासी पाड्यांवर ना वीज पोहोचली, ना हे पाडे हागणदारी मुक्त झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली. पण मुंबईजवळच्या गोराई गावातील आदिवासी पाड्यावर आजही शौचालय नाही.

2008 मध्ये बांधलेली शौचालयं पाणी नसल्यामुळे कोणीही वापरत नाही. त्यामुळे सरकारची घोषणा म्हणजे फार्स आहे, अशी टीका विरोधक करत आहेत.

शौचालय नाही, त्यामुळे आम्ही रात्री उशिरा शौचाला जातो. बाहेर जाताना लाज वाटते. पण पर्याय नाही. इथे पाणी नाही. नेते फक्त मतं मागायला येतात पण नंतर कोणी येत नाही, समस्या तशाच आहेत, असं इथल्या महिला सांगतात.

गोराई गावातील जामझाडा पाड्यात 2008 मध्ये 70 कुटुंबासाठी चार शौचालयं बांधली. पण पाणीच नाही म्हणून लोक शौचालयात जात नाहीत. त्यामुळे सरकारच्या घोषणा या फक्त कागदावरच आहेत हे दिसून येतंय.

दुसरीकडे पंतप्रधानांप्रमाणे मुख्यमंत्रीही  खोटं बोलत आहेत, अशी टीका काँग्रेसने केली आहे.