मुंबई: महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये बड्या आणि अनेक दिवस चर्चेत राहिलेल्या अधिकाऱ्याची एंन्ट्री झाली आहे, आयआरएस अधिकारी समीर वानखेडे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात उतरणार आहेत. ते महायुतीकडूनही निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मुंबईतील विधानसभेच्या जागेवरून समीर वानखेडे निवडणूक लढवणार आहेत.
महाराष्ट्रातील आयआरएस अधिकारी समीर वानखेडे राजकारणात उतरणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार आहे. समीर वानखेडे मुंबईतील धारावी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी समीर वानखेडे यांना आयआरएस पदाचा राजीनामा द्यावा लागणार असून हा राजीनामा केंद्र सरकारच्या गृह विभागाला स्वीकारावा लागणार आहे. त्यानंतर राजकारणातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होईल.
या प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत
समीर वानखेडे आयआरएस अधिकारी आहेत. समीर वानखेडे अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे (NCB) मुंबई विभागाचे माजी संचालक आहेत. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात समीर वानखेडे यांनी कारवाई केली होती. वानखेडेंनी आर्यन खानला अटक केल्यावर त्याची खूप चर्चा झाली होती. त्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले होते.
कोण आहे समीर वानखेडे?
44 वर्षीय समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस अधिकारी आहेत. 2021 पर्यंत त्यांनी मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चे झोनल डायरेक्टर म्हणून काम केले आहे. एनसीबीमध्ये रुजू होण्यापूर्वी वानखेडे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एअर इंटेलिजन्स युनिटमध्ये काम केले होते. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, वानखेडे यांनी अमली पदार्थांच्या अंमलबजावणीशी संबंधित कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. समीर वानखेडे हे छापे, गुप्तचर कारवाया आणि अंमली पदार्थांचे तस्कर आणि त्यांच्या नेटवर्कला लक्ष्य करून गुप्त तपास करण्यात सक्रियपणे सहभागी आहेत. आपल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत 17,000 किलो अंमली पदार्थ आणि 165 किलो सोने जप्त त्यांनी जप्त केले आहे.
समीर वानखेडे यांनी गायक मिका सिंहला मुंबई एअरपोर्टवर परदेशी करंन्सीसह पकडलं होतं. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या टीमनं अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय, राम गोपाल वर्मासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी छापे टाकले होते. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरण मोठ्या प्रमाणावर बाहेर आली. या सर्व कारवायांमागे समीर वानखेडे यांचं दमदार नेतृत्व आहे. त्यांनी रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या अनेक मित्रांची चौकशी केली आहे. अनेक दिवस ते या प्रकरणांमुळे चर्चेत होते.
समीर वानखेडे अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती
समीर वानखेडे हे मराठीतील अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. समीर वानखेडे यांनी 2017 साली मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्याशी दुसरा विवाह केला. त्यांना जुळ्या मुली आहेत.