मुंबई : आरे कॉलनीमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर आयआरसीटीसीनं जॉय राईड्सची सेवा बंद केली आहे. अमन एव्हिएशनच्या माध्यमातून आयआरसीटीसी जॉय राईड्सची सेवा देत होती. मात्र अपघातानंतर या राईड्स बंद करण्यात आल्या आहेत.
मुंबईमध्ये हेलिकॉप्टरद्वारे देण्यात येणाऱ्या जॉय राईड्स तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. पण या कधीपर्यंत बंद ठेवायच्या याबाबत अजून कोणताही विचार करण्यात आलेला नाही, असं आयआरसीटीसीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
आरे कॉलनीतील फिल्टरपाडा परिसरात रविवारी अमन एव्हिएशनचं रॉबिनसन आर 44 नावाचं हेलिकॉप्टर कोसळलं होतं. यात एका पायलटचा मृत्यू झाला होता, तर तीघेजण जखमी झाले होते.
आयआरसीटीसीकडून 2015मध्ये या जॉय राईड्स प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी 2016 पासून अमन एव्हिएशनच्या माध्यमातून या जॉयराईड्स पुरवल्या जात होत्या. जुहू ते गोराई आणि जुहू ते हाजीअली या मार्गावर जॉयराईड्स दिल्या जात होत्या. अपघातानंतर या जॉयराईड्स अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या आहेत.