अंबरनाथ : पारले कंपनीच्या बिस्किटात चक्क अळ्या आढळल्याचा प्रकार अंबरनाथ शहरात समोर आला आहे. अंबरनाथच्या पटेल आर मार्ट दुकानातून हे बिस्कीट विकत घेण्यात आलं होतं.

अंबरनाथच्या शिवगंगानगर परिसरात राहणाऱ्या अशोक देसाई यांच्या पत्नीनं 16 ऑक्टोबर रोजी अंबरनाथच्या पटेल आर मार्ट सुपरमार्केटमधून बिस्किट विकत घेतलं. पारले कंपनीचं ‘पारले टॉप’ बिस्कीट विकत घेतलं होतं.

सोमवारी सकाळी त्यांनी हे बिस्कीट खाल्ल्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. त्यानंतर त्यांनी बिस्किटाचं पाकीट तपासलं असता त्यात त्यांना अळ्या आढळून आल्या. या प्रकारबाबत देसाई यांनी पटेल आर मार्टमध्ये जाऊन तक्रार केली. दुकानदाराने आपली जबाबदारी झटकत कंपनीकडे बोट दाखवलं.

दुकानदाराने जबाबदारी झटकल्याने देसाईंनी कंपनीच्या कस्टमर केअरला फोन केला. पण कंपनीमधूनही त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं अखेर देसाई यांनी पोलीस स्टेशन गाठल. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पारले कंपनी विरोधात तक्रार केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच पारले कंपनी याबाबत योग्य तो निर्णय घेईल, असं दुकानदाराच्या वतीनं सांगण्यात आलं.