मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळल्याच्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे. एनआयएने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आणि अनेक गोष्टी हळूहळू उलगडू लागल्या आहेत. एनआयएने जी इनोव्हा गाडी काल रात्री ताब्यात घेतली तीच गाडी अँटिलियाजवळ दिसली होती. हीच गाडी पोलिस हेड ऑफिसमध्ये देखील दिसून आली होती. ही इनोव्हा गाडी CIU म्हणजे क्राईम इंटेलिजेन्स यूनिटची असल्याचं समोर आलं आहे. याच गाडीचा वापर सचिन वाझे आणि त्यांची टीम करत होती.
विशेष बाब म्हणजे घटनेनंतर या इनोव्हाला पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेअरिंगसाठी पाठवलं होतं. म्हणजे एका उद्देशाने ही कार पोलिसांच्या मोटार ट्रान्सपोर्ट विभागात रिपेरिंगसाठी पाठवण्यात आली होती, जेणेकरुन ही गाडी कुणाच्या नजरेत येऊ नये. या सर्व गोष्टींचा खुलासा झाल्यानंतर अनेकांवर कारवाईचा फास आवळण्याची शक्यता आहे.
Exclusive | सचिन वाझे यांना अडकवलं जातंय; वाझे कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया
पोलीस निरीक्षक रियाज काझी एनआयएच्या ताब्यात
मुंबईत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर वाझे यांचे जवळचे पोलीस निरीक्षक रियाज काझी यांना एनआयएनं ताब्यात घेतलं आहे. यानंतर आणखी एका अधिकाऱ्यालाही ताब्यात घेतलं जाऊ शकतं. याशिवाय दोन ड्रायव्हरचीही चौकशी एआयएकडून सुरु आहे. एनआयएकडून एका पोलीस उपायुक्ताची चौकशी होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
सचिन वाझेंनंतर आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता, NIA सूत्रांची माहिती
सचिन वाझेंवर कोणती कलमान्वये कारवाई?
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. NIA ने सचिन वाझे यांच्यावर आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये कलम 286- जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे, कलम 465 – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती, कलम 506(2) – दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे, कलम 120 B – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे, स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे याचा समावेश आहे.
Sachin Vaze Arrested : सचिन वाझेंना अटक, आतापर्यंत नेमकं काय घडलं, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?