मुंबई : तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रातील नामांकित समजल्या जाणाऱ्या एबीपी ग्रुपच्या (ABP Group) 'इन्फोकॉम मुंबई 2026' या भव्य परिषदेला महाराष्ट्राचे इलेक्ट्रॉनिक्स, आयटी आणि एआय (AI) मंत्री आशिष शेलार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. मुंबईत आयोजित या परिषदेत त्यांनी देशभरातून आलेल्या उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि आघाडीच्या तंत्रज्ञान तज्ज्ञांशी थेट संवाद साधत त्यांना संबोधित केले.
Artificial Intelligence Discussion : 'थीम फॉर अ ड्रीम' संकल्पनेवर विचारमंथन
इन्फोकॉमच्या यंदाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), सायबर सुरक्षा (Cyber Security), डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताच्या भविष्यातील विकासाची दिशा कशी असेल, यावर सखोल चर्चा करण्यात आली. ‘थीम फॉर अ ड्रीम’ (Theme for a Dream) या मुख्य संकल्पनेवर आधारित या परिषदेत तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहासोबत उद्योग आणि प्रशासन क्षेत्रासमोरील नव्या संधी आणि आव्हानांवरही अभ्यासपूर्ण विचारमंथन करण्यात आले.
आशिष शेलार यांच्याकडून कौतुक
यावेळी बोलताना आयटी मंत्री आशिष शेलार यांनी इन्फोकॉमच्या 25 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचे विशेष कौतुक केले. या रौप्यमहोत्सवी परिषदेच्या आयोजनासाठी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची निवड केल्याबद्दल त्यांनी एबीपी ग्रुपचे आभार मानले. नवोन्मेष, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तनावरील अर्थपूर्ण चर्चांना योग्य चालना देणारे इन्फोकॉम हे देशातील एक अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
देशभरातील दिग्गज नेत्यांचा सहभाग
एबीपी समूहाच्या या प्रतिष्ठीत परिषदेत देशभरातील तंत्रज्ञान क्षेत्रातील नेते, कॉर्पोरेट उद्योग प्रतिनिधी आणि वरिष्ठ धोरणकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. एआय, सायबर सुरक्षा, डिजिटल अर्थव्यवस्था (Digital Economy) आणि नव्या तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून भारताच्या पुढील विकासाला गती कशी देता येईल, यावर या परिषदेत विविध सत्रांमधून तज्ज्ञांनी प्रकाश टाकला.
डिजिटल भारताच्या उभारणीसाठी पुढाकार
तंत्रज्ञान क्षेत्रातील परस्पर संवाद, सहकार्य आणि नव्या कल्पनांच्या देवाणघेवाणीसाठी इन्फोकॉम हे नेहमीच अग्रेसर व्यासपीठ मानले जाते. 'डिजिटल इंडिया'च्या (Digital India) उभारणीत आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका अधिक प्रभावी आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने या परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे.
ही बातमी वाचा:
