मुंबई : एकीकडे अभिनेता अजय देवगणचा चित्रपट 'तान्हाजी'ची सध्या बॉलिवूडमध्ये जोरदार चर्चा असताना दुसरीकडे रोबो जगतात सुद्धा एका 'तानाजी' रोबोटची चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातील भुसावळच्या संत गाडगेबाबा अभियांत्रिकी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 'तानाजी' रोबोट तयार केला असून 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये आंतरराष्ट्रीय विजेत्या ब्राझीलच्या 'जनरल' रोबोला टक्कर देण्यासाठी हा 'तानाजी' रोबो सज्ज झाला आहे. टेकफेस्टमधील लढत लक्षात घेऊन 40 विद्यार्थ्यांनी मिळून तानाजीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून, यामध्ये त्याचा वेग वाढविण्यात आला असून अटॅकिंग वेपनचा आकारही बदलण्यात आला आहे.




भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधील अक्षय जोशी या विद्यार्थ्यांने 'ब्लँका बोट्स' ही 40 जणांची टीम बनवली. या टीमने आतापर्यंत आठ रोबो बनवले असून, या सर्व रोबोची नावे ही महाराष्ट्रातील महान पराक्रमी व्यक्तींची नावे देण्यात आली आहे. या टीमने जुलै 2017 साली 'तानाजी' नावाचा 60 वजनी रोबो तयार केला आहे. तानाजी रोबोटने आतापर्यंत महत्वाच्या आंतरराष्ट्रीय लढतीत रशिया आणि चीन रोबोवार स्पर्धेत पहिला व दुसरा अनुक्रमे रँक मिळवला होता. तर याआधी 2017 साली आययटीतील टेकफेस्टमध्ये पहिला रँक तानाजीने मिळवला होता



आयआयटी मुंबईमध्ये 3 जानेवारीपासून सुरू होणार्‍या टेकफेस्टमध्ये यंदा 35 देशातील 48 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत ब्राजील, यूएसए, मलयेशिया, साउथ कोरिया, नेपाल, भूटानसह 35 देश सहभागी होणार आहेत. या 35 देशांमधील 48 संघ स्पर्धेमध्ये आपले रोबो उतरवणार आहेत. त्याचप्रमाणे भारतातून तब्बल 50 रोबोट यामध्ये सहभागी होणार आहेत.



दरवर्षीप्रमाणे देशातील अनेक संघ आपले रोबो उतरवणार असले तरी 'जनरल'ला पराभूत करण्याच्या उद्देशानेच 'तानाजी'ला मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. यावर्षी तानाजीमध्ये या महत्त्वपूर्ण लढतीसाठी काही बदल करण्यात आले आहे. यामध्ये तानाजीचा 700 आरपीएम इतका असलेला वेग वाढवून 900 आरपीएम इतका करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तानाजीच्या हल्ला करण्याच्या शस्त्रांमध्येही बदल करण्यात आले आहेत. तानाजीचा असिमिट्री ड्रम स्पिनर हा अधिक कठीण करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे त्याच्या पॉवर क्षमतेमध्येही वाढ करण्यात आली आहे.