मुंबई : गेले दहा महिने बंद असलेली मुंबईतील चेंबूर ते वडाळा ही मोनोरेल अखेर आज (शनिवार) पहाटे सहा वाजल्यापासून पुन्हा सुरू झाली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या आगीच्या घटनेपासून बंद असलेली मोनो पुन्हा एकदा सुरु झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

शनिवारी सकाळी सहा वाजता पहिली मोनोरेल वडाळा आणि चेंबूर या दोन्ही स्थानकांवरून सुटली. ही मोनो रात्री दहा वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. दर पंधरा मिनिटांनी एक फेरी असेल. या टप्प्यावर मोनो दिवसभरामध्ये 130 फेऱ्या मारणार आहे.

चेंबूर ते वडाळा ही देशातील पहिली मोनोरेल आहे. मोनोरेलचा दुसरा टप्पा 2 फेब्रुवारी 2019 पासून सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे एमएमआरडीएला यामुळे नुकसान सहन करावं लागलं होतं. आता पुन्हा एकदा मोनो सुरु करण्यात आली असली तरी तिकीट दर मात्र वाढवण्यात आलेला आहे.

प्रतिट्रीप 10,600 रुपयांचा दर

प्रतीट्रिपच्या खर्चावरुन आपल्या आणि लार्सन ऍण्ड टुब्रो आणि मलेशियाची स्कोमी इंजिनिअरिंग (एलटीएसई) या कंपनीतील कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने 15 ऑगस्ट रोजी जैन समितीची नियुक्ती केली होती.

एलटीएसईने मोनोरेल्वे चालवण्यासाठी एका ट्रिपमागे 18 हजार रुपयांची मागणी केली होती. परंतु जैन समितीने 10,600 रुपयांचा दर ठरवला. त्यानंतर एमएमआरडीएने ट्रिपमागे 10, 600 रुपये देण्याचं मान्य केलं आहे.

दरम्यान, फेब्रुवारी 2019 पर्यंत मोनोरेलचा दुसरा टप्पा सुरु झाला की हा दर आणखी वाढवून देण्यात येणार आहे.

नोव्हेंबर 2017 पासून सेवा बंद, कोट्यवधींचा तोटा

नोव्हेंबर, 2017 मध्ये म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ मोनो रेलच्या डब्ब्यांना आग लागली होती. यात मोनोरेलचे दोन डब्बे जळून खाक झाले होते. तेव्हापासून मोनोरेलची सेवा ठप्प आहे.

मोनोरेलच्या पहिल्या टप्प्यात दररोज 18 हजार ते 20 हजार लोक प्रवास करत होते. मोनोरेलची सेवा बंद झाल्याने एमएमआरडीएला दर महिन्याला 1 कोटी 80 लाख रुपयांचा तोटा होत आहे.

फेब्रुवारी 2019 पासून दुसरा टप्पा

एमएमआरडीए आयुक्त आर.ए.राजीव यांच्या माहितीनुसार, "पहिला टप्पा आम्ही एक सप्टेंबरपासून सुरु करत आहोत. दुसऱ्या टप्प्यासाठी रेकची फिटनेस टेस्ट डिसेंबरपर्यंत पूर्ण केलं जाईल. यानंतर जानेवारी अखेरपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करुन 2 फेब्रुवारी, 2019 पासून मोनोरेलचा दुसरा टप्पा वडाळा ते जेकब सर्कल दरम्यान सुरु केला जाईल."