'त्या' प्रसिद्ध पहिलवानाचा आखाड्यात कुस्ती खेळताना मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 18 Feb 2019 11:34 PM (IST)
एका पहिलवानाचा कुस्तीच्या आखाड्यातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परशुराम झिपऱ्या पाटील (65) असे त्या पहिलवानाचे नाव आहे. ते जुनांदूर्खी गावचे रहिवासी होते.
भिवंडी : एका पहिलवानाचा भिवंडी तालुक्यातील कल्याण - शील रोडवरील मौजे वाकलन गावात कुस्तीच्या आखाड्यातच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. परशुराम झिपऱ्या पाटील (65) असे त्या पहिलवानाचे नाव आहे. ते जुनांदूर्खी गावचे रहिवासी होते. परशुराम पाटील (परशा वस्ताद) यांना शालेय जीवनापासूनच कुस्तीची आवड असल्याने वयाच्या साठीनंतरदेखील ते कुस्ती खेळत होते. शरीर बळकट राहावे यासाठी ते दररोज 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास पायीच करायचे. कुस्ती खेळ कायम टिकून राहावा यासाठी शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनींसाठी परशा वस्ताद गेल्या अनेक वर्षांपासून आखाडा चालवत आहेत. रविवारी ठाणे तालुक्यातील वाकलन गावच्या जत्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा असल्याने परशा वस्ताद त्यांचा सरवली येथील मित्र गजानन चौधरी (गजा वस्ताद) यांना सोबत घेऊन कुस्ती खेळण्यासाठी गेले होते. या जत्रेत आयोजकांनी एका तरुण कुस्तीपटूसोबत परशुराम यांचा सामना लावला. यावेळी दोघा कुस्तीपटूंमध्ये झटापट झाली. परंतु प्रतिस्पर्धी खेळाडूने परशा वस्ताद यांना जमिनीवर आपटले. डोक्यावर आपटल्यामुळे परशुराम पहिलवानांची डोक्याची नस दबल्याने ते जागेवरच बेशुद्ध पडले. त्यांना सहकारी गजा वस्ताद यांनी तत्काळ परशुराम यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.