भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची अधिकृष घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "काही मुद्द्यांवर आमचे आणि शिवसेनेचे मतभेद असतील, परंतु सैद्धांतिकदृष्ट्या आम्ही दोघेही हिंदुत्वाचा विचार मानणारे पक्ष आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत."
फडणवीस म्हणाले की, "सत्ता, पदे याला महत्त्व न देता शेतकऱ्यांचे, गरिबांचे व्यापक प्रश्न घेऊन आम्ही युतीचा निर्णय घेतला आहे. राम मंदिर व्हावे, या शिवसेनेच्या मागणीला आमचं समर्थन आहे. तसेच नाणार संदर्भात उद्योग विकासाला विरोध नाही, परंतु स्थानिकांना सोबत घेऊन निर्णय घ्यायला हवा, शिवसेनेच्या या मागणीचा विचार करून जिथे लोकांची इच्छा असेल तिथेच प्रकल्प राबवण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत."
हा धमाल व्हिडीओ पाहाच : युतीच्या राजकारणाची ब्लॉकबस्टर फिल्म
500 चौरस फुटांपेक्षा लहान घरात राहणाऱ्या रहिवाशांना करातून सूट देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. व्यापक जनहितासाठी आम्ही युतीचा निर्णय घेतला असून जागावाटप किंवा सत्तेसाठी घेतलेला नाही. लोकसभेकरता शिवसेना 23 आणि भाजप 25 जागा लढेल. विधानसभेसाठी मित्र पक्षांशी चर्चा करून उरलेल्या जागा शिवसेना आणि भाजप अर्ध्या-अर्ध्या वाटून घेऊ.