मुंबई : एलफिन्स्टन रोड आणि परळमध्ये लष्कराच्या मदतीने पादचारी पूल उभारण्याचं काम वेगात सुरु आहे. या कामकाजासाठी शनिवारी म्हणजे आज रात्री 12 ते पहाटे 5 वेळेत विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच रविवारी रात्री 1.30 ते सकाळी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
एलफिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेनंतर येथील पादचारी पूल उभारण्याचं काम लष्कराकडे देण्यात आलं होतं. लष्कर हे काम करण्यासाठी सज्ज आहे. मेगाब्लॉक घेऊन लष्कराकडून पुलाचं काम करण्यात येणार आहे.
विशेष मेगाब्लॉक दरम्यान, वडोदरा एक्स्प्रेस, गोल्डन टेम्पल मेल, गुजरात मेल आणि सौराष्ट्र मेल या एक्स्प्रेस दादर स्थानकात थांबणार नाहीत. तसेच अहमदाबाद-मुंबई सेंट्रल (रेल्वे क्रमांक 59442) ही एक्स्प्रेस बोरीवली स्थानकात थांबवण्यात येणार आहे. काही मेल आणि एक्सप्रेस या मेगाब्लॉकमुळे सुमारे 15 मिनिटे उशिराने चालवण्यात येतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, यापूर्वी मध्य रेल्वेच्या आंबिवली स्टेशनवरील पुलाचं कामही लष्कराकडून करण्यात आलं होतं. काही तासातच लष्काराने या पुलाची बांधणी केली होती.