मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 ची रणनीती आखण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) घटकपक्षांची मुंबई (Mumbai) 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान इंडिया आघाडीचा लोगो (Logo) जारी केला जाण्याची शक्यता आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने रविवारी (20 ऑगस्ट) ही माहिती दिली.


मुंबईमध्ये इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लूसिव्ह अलायन्स (INDIA) ची तिसरी बैठक होणार आहे. या बैठकीत 26 पेक्षा अधिक राजकीय पक्षांचे जवळपास 80 नेते सामील होण्याची शक्यता आहे. सध्या 26 पक्ष इंडिया आघाडीमध्ये सहभागी आहेत. दोन दिवसीय बैठकीदरम्यान आणखी काही दल आघाडीत सहभागी होण्यासाठी तयार आहेत.


उद्धव ठाकरे यांच्याकडून डिनरचे आयोजन


सूत्रांच्या माहितीनुसार, आघाडीच्या लोगोचं अनावरण 1 सप्टेंबर रोजी बैठकीला सुरुवात होण्याआधी केलं जाऊ शकतं. विरोधी पक्षांच्या आघाडीची पहिली बैठक यंदा 23 जून रोजी पाटणा आणि दुसरी मागील महिन्यात  17 आणि 18 जुलै रोजी बंगळुरुमध्ये झाली होती.


सूत्रांच्या माहितीनुसार, पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह 'इंडिया' आघाडीचे नेते 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या आधी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे 31 ऑगस्त रोजी मुंबई उपनगरातील ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये येणाऱ्या नेत्यांसाठी रात्रीच्या जेवणाचं आयोजन केलं जाणार आहे. पुढील दिवशी त्याच ठिकाणी बैठक होईल आणि त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित केली जाईल.


काँग्रेसतर्फे स्नेहभोजनाचं आयोजन


महाराष्ट्र आणि मुंबई काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी दुपारी जेवणाचं आयोजन केलं जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेते राहुल गांधी 1 सप्टेंबरच्या बैठकीनंतर मध्य मुंबईतील प्रदेश काँग्रेस मुख्यालय टिळक भवनला भेट देऊ शकतात.


बैठक यशस्वी व्हावी यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) नेते सूक्ष्म पातळीवरील नियोजनात गुंतले आहेत, असे काँग्रेसचे महाराष्ट्र युनिटचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "हॉटेलवर पोहोचल्यावर विरोधी पक्षांचे पारंपरिक स्वागत केले जाईल. तयारीचा भाग म्हणून सर्व नेते नियमित बैठका घेत आहेत." रविवारी झालेल्या बैठकीत शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत, काँग्रेस नेते वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा आणि नसीम खान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (राष्ट्रवादी) नेते नरेंद्र वर्मा या बैठकीला उपस्थित होते.


हेही वाचा


Opposition Meeting: मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीची तयारी सुरू; कसा आहे मास्टर प्लॅन?