मुंबई: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरं बोलावं. आजचं भाषण हे प्रचाराचं भाषण होतं. लाल किल्ल्यावरुन हे मोदींचे शेवटचे भाषण असेल. पुढचा पंतप्रधान आमचाच असेल”, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.


मुंबईत काँग्रेसच्या टिळक भवन कार्यालयात अशोक चव्हाणांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते.

देशात 15 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यावर मोदी काहीही बोलत नाहीत. मीरा भाईंदरमध्ये बॉम्ब मिळूनही ही कारवाई का होत नाही? सनातन संस्थेवर बंदी का घातली जात नाही?.कोर्टात खटले का व्यवस्थित चालत नाहीत? असे सवाल  अशोक चव्हाण यांनी उपस्थित केले.

त्यामुळे  पंतप्रधानाचे हे लाल किल्ल्यावरील शेवटचे भाषण असेल. पुढचा पंतप्रधान हा आमचा असेल. जनता नक्कीच कौल देईल, असं अशोक चव्हाण म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढणार आहे. 31 ऑगस्टपासून अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा निघेल. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर,पुणे जिल्ह्यातून ही संघर्षयात्रा निघणार आहे.

मुख्यमंत्र्यांचं भाषण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात ध्वजारोहण झालं. 72 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांनी मंत्रालयात ध्वजवंदन केल्यानंतर जनतेला संबोधित केलं. राज्यात मागील एक वर्षात संघटीत क्षेत्रात 21 लाख रोजगार उपलब्ध झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

पंतप्रधानांचं भाषण

भारताच्या 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्लावरून पाचव्यांदा देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी तिहेरी तलाक, देशातील गरिबी, देशाची आर्थिक प्रगती, महिला सुरक्षा यासारख्या विविध विषयांना हात घातला. तसेच सरकारच्या चार वर्षाच्या कामकाजाचा लेखाजोखाही सांगितला. स्वातंत्र्य दिनाला मोदींनी देशातील गरीब जनतेसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा केली.

संबंधित बातम्या 

स्वातंत्र्य दिन : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे  

गरीब कुटुंबांसाठी 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'ची घोषणा  

2022पर्यंत अंतराळात तिरंगा फडकणार- मोदी  

नेहरु, मनमोहन, वाजपेयी ते मोदी, लाल किल्ल्यावर कुणाचं किती मिनिटे भाषण?  

आम्ही चार वर्षात जे केलं, त्यासाठी शंभर वर्ष कमी पडली असती- मोदी  

राज्यात संघटित क्षेत्रात 8 लाख रोजगार उपलब्ध : मुख्यमंत्री