मुंबई : या लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचविणे शक्य होईल यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. असे असताना विविध पर्यायाचा अवलंब शिक्षण विभाग करताना पाहायला मिळतंय. याचाच एक भाग म्हणून जिओ टीव्ही प्लॅटफॉर्म वर इयत्ता 12 वी सायन्स, इयत्ता 10 वी मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी जिओ ज्ञानगंगा हे तीन चॅनेल आजपासून सुरू करण्यात आले असून जिओ सावन हे रेडिओ चॅनेलवर 'आम्ही इंग्रजी शिकतो' (we learn english) या कार्यक्रमाचा सुद्धा आज उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थित व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे करण्यात आले.


कोरोनाच्या पार्शवभूमी शाळा बंद असल्या तरी राज्यातील मुलांचा शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके पोहचविण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात असून हे काम अंतिम टप्यात असल्याचं शिक्षण विभागाने सांगितले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्याकडून शैक्षणिक दिनदर्शिका देण्यात आली असून त्याद्वारे विद्यार्थी स्वयंअभ्यास करू शकणार आहेत.


पैठण येथील संतपीठ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा प्रयत्न


रोज सहा तास तासिका प्रक्षेपित होणार
या जिओ प्लॅटफॉर्मवरील तीन चॅनेलवर रोज सहा तास तासिका प्रक्षेपित केल्या जातील व इतर अठरा तास त्याचे पुनप्रक्षेपण केलं जाणार आहे. याचे वेळापत्रक www.maa.ac.in या संकेतस्थळावर दिले जाईल. यासोबतच लवकर इतर 9 जिओ चॅनेल सुद्धा सुरू केले जाणार आहेत. यामध्ये इयत्ता 10 वी (उर्दू माध्यम), इयत्ता 9 वी (मराठी माध्यम) , इयत्ता 9 वी (इंग्रजी माध्यम), इयत्ता 9 वी (उर्दू माध्यम), इयत्ता 8 वी, 7वी आणि 6 वी (इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यम) व इयत्ता तिसरी-चौथी (इंग्रजी, उर्दू, मराठी) चॅनेल लवकरच सुरू केले जाणार आहे.


इयत्ता निहाय 24 तास चॅनेल
यावेळी शिक्षणमंत्री म्हणाल्या, 'हे इयत्ता निहाय चॅनेल 24 तास सुरू राहतील सध्या राज्यातील 4.3 कोटी लोकांकडे जिओ फोन, जिओ मोबाइल आहे, त्यात ते जिओ टीव्हीद्वारे या तासिकातुन अभ्यास करू शकतील. शिवाय, इतर मोबाइल धारकांसाठी जिओ चॅट अॅपद्वारे इयत्ता निहाय ई साहित्य मोबाइलमध्ये उपलब्द करुन देण्याचे नियोजन शिक्षण विभागाचे आहे'. शिवाय जिओ सावन अॅपवर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बोलकी पुस्तके उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.


School Fee | शाळांच्या नियमित फी आकारणीवर पालकांचा आक्षेप; यंदा फक्त ट्युशन फी घ्या, पालकांची मागणी