ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थीनी वसतिगृहात सुरक्षारक्षक महिलेवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाला आहे. एका व्यक्तीने महिला सुरक्षारक्षकावर चाकूने वार केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. आरोपी विकास धनावडे याला पोलिसांनी अटक केली आहे.


बबिता दुबे असं 44 वर्षीय पीडित महिलेचं नाव आहे. ठाण्यातील खोपट परिसरातील हंसनगर येथील ठाणे महानगरपालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्था आणि वैद्यकीय विद्यार्थीनी वसतिगृहात बबिता सुरक्षारक्षक आहेत. सोमवारी संध्याकाळी आरोपी विकासने एकतर्फी प्रेमातून बबिता यांच्यावर चाकू हल्ला केला.


विकासने बबिता यांच्यावर हल्ला केला त्यावेळी अनेकांनी त्याठिकाणी गर्दी केली. मात्र कुणीही बबिता यांच्या मदतीला पुढे आले नाही. अखेर दोन तरुण मोठ्या हिम्मतीने बबिता यांच्या मदतीला पुढे आले. बबिता यांच्यावर ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.


नौपाडा पोलिसांनी आरोपी धनवडे याला अटक केली आहे. ठाण्यात भर रस्त्यात तरुणीवर एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला करण्याचा गेल्या काही महिन्यातील हा तिसरा प्रकार आहे.