मुंबई : ओला, उबेर कॅब चालकांचा विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप सलग 11 व्या दिवशीही सुरू आहे.  ओला, उबर कॅब 22 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. एसी हॅचबॅक कॅबसाठी प्रतिकिलोमीटर 16 रुपये, एसी सेदान कॅबसाठी प्रतिकिलोमीटर 18 रुपये तर एसी एसयूव्ही कारसाठी पहिल्या चार किलोमीटरला किमान 100 ते 150 रुपये भाडेदर निश्चित ठेवावे, अशी कॅब चालकांची कंपन्यांकडे मागणी आहे.


मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर टॅक्सी व्यवस्थेत अचानक आलेल्या बदलामुळे प्रवाशांच्या लांब रांगा असून ओला-उबेरच्या संपामुळे परिस्थिती अजून बिघडली आहे.  मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना टॅक्सीसाठी रात्री लांब रांगेत तासन-तास उभे रहावे लागले. जीविके या कंपनीनं विमानतळावरच्या टॅक्सी सुविधेचा कार्यभार टॅक्सी वेल्फेअर युनियनकडून घेतला आहे.

मुंबईत पहाटेच्यावेळी कॅब कमी संख्येत असतात. पण त्याचवेळी कंपन्या प्रवाशांकडून तिप्पट भाडं आकारतात. पण त्याचा फायदा चालकांना होत नाही. पेट्रोल, डिझेलचे दर वाढलेत. तर दुसरीकडे उबर सारख्या कंपनीने भाडेदरात कपात केली आहे. याचा परिणाम आमच्या उत्पन्नावर झाला आहे.  संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांकडे ओला, उबेर कॅब चालकां मागण्या मांडून देखील दुर्लक्ष केलं जात आहे, असं आंदोलक चालकांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आंदोलनाला आता गालबोट लागण्यास सुरुवात झाली असून नुकतेच पुण्यातून मुंबईत भाडे घेऊन आलेल्या पुण्यातील एका ओला चालकाला भांडूप येथे संपात सहभागी झालेल्या काही ओला-उबेरच्या चालकांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला होता.  26 तारखेला संताजी पाटील हा ओला चालक मुंबईत प्रवासी सोडण्यास आला होता. यावेळी मुंबईत आंदोलन करीत असलेल्या चालकांच्या शकलीत तो फसला. हे आंदोलक स्वतः ओला-उबेर ची बुकिंग करुन, जी गाडी येईल तिच्या चालकांना मारहाण करीत होते. अशाच प्रकारे पुण्यावरून मुंबईत आलेल्या संताजी यांना देखील त्यांनी गाठले. त्यांना भांडूपच्या अमरनगर भागात एका कार्यालयात घेऊन जाऊन तिथे त्याला हाताने आणि पट्ट्यांनी मारहाण करण्यात आली. एवढेच कमी की काय त्याला कपडे उतरवून उठाबशा देखील काढायला लावल्या होत्या.