कल्याण: दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. या प्रदूषणावर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं बारीक लक्ष असणार आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यात तीन ठिकाणी हवेतल्या प्रदूषणाची चाचणी सुरूही करण्यात आली आहे. कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर अशा तीन ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषण मोजणाऱ्या मशिन्स कार्यान्वित केल्या आहेत. त्यामुळे दिवाळीचा आनंद साजरा करताना प्रदूषणाबाबत भान ठेवणं आवश्यक आहे.

दिवाळीच्या काळात फटाके फोडण्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असतं. यामुळेच यंदा न्यायालयानंही फटाके फोडण्यावर नियम आणि अटी लावल्या आहेत. मात्र दुसरीकडे याच प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळही सज्ज झालंय. यासाठी ठाणे जिल्ह्यात तीन ठिकाणी हवेतल्या प्रदूषणाची चाचणी सुरूही करण्यात आली आहे.

कल्याण, भिवंडी आणि उल्हासनगर अशा तीन ठिकाणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने वायू प्रदूषण मोजणाऱ्या मशिन्स कार्यान्वित केल्या आहेत. या मशीनद्वारे दिवाळीच्या एक आठवडा आधीपासून ते दिवाळी संपेपर्यंत हवेची रोज चाचणी केली जाणारेय. या चाचणीत प्रदूषणाची रोजची आकडेवारी तर दिसेलच, शिवाय दिवाळीच्या तीन ते चार दिवसात वायू प्रदूषण किती वाढलं, हे सुद्धा आकडेवारीसहीत समोर येणार आहे.

या चाचणीत जर प्रदूषणाची आकडेवारी धोक्याच्या पातळीबाहेर गेली तर अर्थातच याचे परिणाम पुढील वर्षीपासून आपल्याला भोगावे लागू शकतात. कारण प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल संवेदनशील आला तर कदाचित पुढील वर्षीपासून फटाक्यांवर पूर्णपणे बंदीही लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.