मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्षांमध्ये महायुती होणारच आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची शिवसेनेला सोबत घेऊन निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये छोट्या गोष्टींवरुन वाद न होता ही निवडणूक एकत्र लढवणे गरजेचं असल्याचं मत खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.


दोन्ही पक्षांनी आपल्या शक्तीप्रमाणे जागावाटपाची चर्चा केली पाहिजे. महायुतीमध्ये 18 जागा मित्र पक्षाला मिळणार आहेत. त्यापैकी 10 जागांवर आरपीआय निवडणूक लढणार आहे. येत्या दोन दिवसात भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या जागा जागावाटपासंदर्भात चर्चा व्हावी, यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार आहे. विधानसभा निवडणुकीत 240 ते 250 जागांवर आमचा विजय होईल, असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला.


राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर आरपीआयला सरकारमध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्य मंत्रिपद मिळालं पाहिजे, अशी मागणीही रामदास आठवलेंनी केली. यावेळी तिसरी आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी संदर्भात बोलताना आठवले म्हणाले की, विरोधी आघाडी करुन सत्ता मिळवणं हे शेकडो वर्ष वर्ष तरी शक्य नाही. तिसऱ्या आघाडीला निवडून येण्याएवढीही मतं मिळत नाहीत. त्यामुळे एखाद्या मोठ्या पक्षाच्या सोबत राहणे कधीही चांगलं आहे. वंचित बहुजन आघाडीमुळे आम्हाला अधिक फायदा होणार असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं.


VIDEO | टॉप 25 न्यूज बुलेटिन | 21 सप्टेंबर 2019