वसई, विरार : बनावट कागदपत्रांच्या आधारे 55 अनधिकृत इमारती बांधल्या प्रकरणात आता पहिल्या दोन इमारतीवर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुरुकृपा 1 आणि गुरुकृपा 2 या दोन इमारतीच्या जमीन मालकासंह सात विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात आता तक्रारदाराला काही बिल्डरांचे हस्तक धमकी देत असल्याने, तक्रारदारांच्या जिवितेला धोका उद्भवू शकतो. तर, यात आरोपींनी मयत झालेल्या वास्तुविशारदाच्या नावाने बनावट आराखडा तयार केल्याचंही उघड झालं आहे. याशिवाय आरोपींकडे वकील तसेच डॉक्टरांच्या नावाने बनावट शिक्के आढळले आहेत. 


बनावट कागपत्रांच्या आधारे 55 इमारतींचं बांधकाम


विरारच्या कारगील नगर येथील गुरुकृपा अपार्टमेंट इमारत अंत्यत दाटीवाटीत ही इमारत बोगस कागदपञाच्या आधारे बनवली आहे. ज्या बनावट कागदपञांच्या आधारे 55 अनधिकृत इमारती बांधल्याचं प्रकरण उजेडात आलं होतं. त्यात आता गुरुवारी दोन इमारतीवर गुन्हे दाखल झाले आहेत. निजामुद्दीन पटेल, संज्यात आलेस लोप, तेरेस फ्रान्सिंस लुद्रिक, मच्छिंद्र मारुती व्हनमाने, दिलीप अनंत अडखळे, प्रशांत मधुकर पाटील, देवेंद्र केशव माजी या सात विकासकांवर फसवणूक, बनावट कागदपत्रे बनवणे तसेच एआरटीपीए कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.


मयताच्या नावाने बोगस इमारतीचा आराखडा


या प्रकरणाचा तपास सुरू असताना, आता अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. बोगस इमारतीचा आराखडा विरारमधील प्रसिद्ध वास्तुविशारद (आर्किटेक्ट) के.डी. मिस्त्री यांच्या नावाने 2019 मध्ये बनविण्यात आला होता. मात्र केडी मिस्त्री यांचे 2016 मध्येच निधन झाले होते. तर, रुद्रांश इमारतीवर गुन्हा दाखल करणाऱ्या निझिया खान हिला बिल्डरांच्या हस्तकांची जीवे ठार मारण्याची धमकी येत आहे. 


सात जण आणि दोन इमारतींवर गुन्हे दाखल


विरार पोलिसांनी पालिकेतून मिस्त्री यांच्या मृत्यूचा दाखला मागवला आहे. गुरुवारी पोलिसांनी मयत के.डी. मिस्त्री यांचा मुलगा अतुलभाई मिस्त्री यांचा ही जबाब नोंदवला आहे. तर, के.डी. मिस्ञी सारखे वसईतील प्रतिष्ठीत वकील ॲड. नंदन भगत यांच्या ही नावे बोगस लेटर हेड आणि बनावट स्टँम्प बनवले आहेत. त्यामुळे त्यांनी ही विरार पोलीस ठाण्यात आपला जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात आणखीन एका वकीलाचा ही जबाब नोंदवण्यात येणार आहे. 


या प्रकरणातील तीन मुख्य आरोपी अजूनही न्यायायलीन कोठडीत आहेत. त्यांची नव्याने पोलीस कोठडी घेऊन चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी सांगितले. तर, यात आणखीन ही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. ज्या ज्या विभागात त्या इमारती असतील त्या त्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती कांबळे यांनी दिली आहे.