मध्य रेल्वेनं सीएसटीकडे जाताना मुलुंड रेल्वे स्थानकावरून दिसणारं एक गणपती मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केल्याशिवाय, एकही लोकल मुंलुंडवरून पुढे जात नाही. मात्र, याच मंदिरातला गणपती बाप्पा, एका मोठ्या घोटाळ्याचा सावज ठरला आहे.
बी. आर. जोगदनकर नावाच्या प्रवाशानं वर्षभरापूर्वी मंदिराला दिलेल्या देणगीनंतर या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. संशय आल्यानं जोगदनकर यांनी माहिती अधिकारातंर्गत माहिती मिळवली आणि लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या आरपीएफचं पितळ उघडं पडलं.
1984 साली आरपीएफच्या आजी-माजी अधिकाऱ्यांनी बांधलेलं हे मंदिर अनधिकृत असल्याचं रेल्वे प्रशासनानंच कबूल केलं आहे. एवढंच नव्हे, तर गणपतीच्या नावाखाली आरपीएफ अधिकाऱ्यांकडून राजरोसपणे बेकायदा वर्गणी गोळी केला जाते आहे.
मंदिराच्या कमिटीवर असणारे 10 ते 12 जण आरपीएफचे आजी-माजी अधिकारी असल्याचं समजतं आहे. कदाचित म्हणूनच, तक्रारीला वर्ष उलटूनही या प्रकरणी रेल्वे प्रशासन आणि आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई केली गेली नाही.
मंदिराला देण्यात येणारी देणगी थेट आरपीएफ अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचं समजतं आहे. कारण संस्थेचं पॅनकार्डही नाही आणि कोणती अधिकृत नोंदणीही नाही. गणपतीला हाताशी धरून, भक्तांचा खिसा खाली करणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडवली पाहिजे. कारण हा फक्त आर्थिक घोटाळा नाही तर लोकांच्या श्रद्धेशी केलेला खेळ आहे.
आता केंद्रीय रेल्वे मंत्री या घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर कृपा दाखवणार का अवकृपा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाहा स्पेशल रिपोर्ट -