IIT Mumbai Darshan Solanki :  दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात (Darshan Solanki Suicide Case) मोठी बातमी समोर आली आहे. या आत्महत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष चौकशी पथकाला (SIT) दर्शन सोलंकीची सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये दर्शनने या पत्रात एका विद्यार्थ्याचे नाव घेतले असून त्याने मानसिक त्रास आणि धमकावले असल्याचा आरोप केला आहे. 


मागील महिन्यात आयआयटी मुंबईतील विद्यार्थी दर्शन सोलंकीने आत्महत्या केली होती. ही आत्महत्या जातीय भेदभावामुळे होत असल्याचा आरोप आयआयटीतील विद्यार्थी संघटनांनी आणि इतर सामाजिक संघटनांनी केला होता. त्यानंतर आयआयटीने एक समिती स्थापन केली होती. तर, सामाजिक संघटनांच्या दबावानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेता एक सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांच्या नेतृत्वात ही एसआयटी स्थापन केली होती. त्यानंतर या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या पथकाला दर्शन सोलंकीची सुसाइड नोट मिळाली आहे. दर्शनने आत्महत्या करण्यामागे जातीवाचक टिप्पणीदेखील कारणीभूत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सुसाइड नोटमध्ये दर्शनने एका विद्यार्थ्याचे नाव लिहिले असून त्याच्याकडून मानसिक छळ आणि धमकी दिली जात असल्याचे म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या एसआयटीला मिळालेल्या या सुसाइड नोटमुळे आता दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणाला मोठे वळण मिळण्याची शक्यता आहे. 


आयआयटीच्या समितीने नाकारले होते आरोप


दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मुंबई आयआयटीने (Indian Institute of Technology Mumbai) स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला होता. या अहवालात समितीने दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात जातीभेद केला जात असल्याचा आरोप पूर्णपणे नाकारला आहे. शैक्षणिक कामगिरी हे त्याच्या आत्महत्या करण्यामागचं कारण असल्याची शक्यता मुंबई आयआयटीने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद केले होते. 


दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरण काय?


दर्शन सोळंकी (वय 18 वर्षे) या विद्यार्थी मुंबई आयआयटीमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता.  त्याने 12 फेब्रुवारी रोजी कॅम्पसमधल्या हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. दर्शन हा मूळचा अहमदाबादचा (Ahmedabad) असून तो तीन महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी आयआयटी मुंबईत आला होता. 11 फेब्रुवारी रोजी त्याची परीक्षा झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारी त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.


दर्शन सोलंकीच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईतील 'दस्तक', आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल आणि इतर संघटनांनीदेखील जातीय भेदभावातून आत्महत्या झाली असल्याचा दावा केला होता. तर, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, जाती अंत संघर्ष समिती, जनवादी महिला संघटना, डीवायएफआयसह डाव्या संघटनांनी आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन केले होते. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: