IIT Bombay Suicide : दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात (Darshan Solanki Suicide Case) मुंबई आयआयटीने (Indian Institute of Technology Mumbai) स्थापन केलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात समितीने दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात जातीभेद केला जात असल्याचा आरोप पूर्णपणे नाकारला आहे. शैक्षणिक कामगिरी हे त्याच्या आत्महत्या करण्यामागचं कारण असल्याची शक्यता मुंबई आयआयटीने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात नमूद केली आहे.


मुंबईतील पवई आयआयटीमध्ये शिकणाऱ्या दर्शन सोळंकी या विद्यार्थ्याने 12 फेब्रुवारी रोजी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली होती. जातीभेदामुळे दर्शनने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई आयआयटीने या आरोपांची सत्यता पडताळण्यासाठी 12 सदस्यांची समिती स्थापन केली होती. त्या समितीने जातीभेदाचे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. शैक्षणिक कामगिरी हे त्याच्या आत्महत्यामागील कारण असल्याचं समितीने म्हटलं आहे. 


दरम्यान दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात एसआयटी देखील गठित केली आहे. ही एसआयटी सुद्धा या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.


12 जानेवारी रोजी दर्शन सोळंकीची आत्महत्या


दर्शन सोळंकी (वय 18 वर्षे) या विद्यार्थी मुंबई आयआयटीमध्ये केमिकल इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षात शिकत होता.  त्याने 12 फेब्रुवारी रोजी कॅम्पसमधल्या हॉस्टेलच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. दर्शन हा मूळचा अहमदाबादचा (Ahmedabad) असून तो तीन महिन्यांपूर्वीच शिक्षणासाठी आयआयटी मुंबईत आला होता. 11 फेब्रुवारी रोजी त्याची परीक्षा झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारी त्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.


जातीभेदाच्या मनस्तापाला कंटाळून आत्महत्या केल्याचा संघटनांचा आरोप


यानंतर पवई पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला. परंतु, जातीभेदाच्या मनस्तापाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप काही संघटनांनी केला होता. मुंबई आयआयटीमधील 'आंबेडकर पेरियार फुले स्टुडंट सर्कल' या संघटनेने या संदर्भात पत्रक काढून दर्शन याने जातीभेदातूनच आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं. कॅम्पसमध्ये अनुसूचित जाती-जमातीमधील विद्यार्थ्यांसोबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. यातूनच दर्शन याने आत्महत्या केल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या संघटनेच्या म्हणण्यानुसार, मुंबई आयआयटीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जातीभेद दिसून येतो. दलित-बहुजन विद्यार्थ्यांना जातीबद्दल आणि आरक्षण विरोधी बोलून हिणवलं जातं. दर्शन सोळंखी याची आत्महत्या याच मनस्तापला कंटाळून झाली असल्याचा संशय या संघटनेने व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या आरोपानंतर मुंबई आयआयटीकडून याबाबत 12 सदस्यीय समिती नेमण्यात आली होती. याशिवाय पवई पोलिस देखील या आत्महत्येबाबत कसून तपास करत आहे.  


संबंधित बातमी


मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्याच्या आत्महत्ये प्रकरणी समिती स्थापन, आयआयटी प्रशासनाचा निर्णय