याबाबत मुंबई आयआयटीचे संचालक सुभाषिश चौधरी यांनी ही माहिती देताना सांगितलं की, 'पुढील शैक्षणिक वर्षाला सुरू होण्यास अधिक उशीर होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला असून ते कधी आणि कसे सुरू होतील? याबाबत विद्यार्थ्यांना लवकरच कळवलं जाणार आहे. शिवाय, मुंबई आयआयटीतील अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीचा सुद्धा आपण विचार यामध्ये केला असून हे ऑनलाईन शिक्षण सुरू करत असताना एकही विद्यार्थी या शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी पूर्णपणे संस्था नियोजन करत असून याची पुरेपूर काळजी घेतली जाणार आहे'. ऑनलाईन शिक्षण सुरू करायचे झाल्यास त्यासाठी आवश्यक कंप्यूटर, लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन या सुविधा प्रत्येकाला मिळाव्यात जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी हे ऑनलाईन वर्गाला उपस्थित राहील, यासाठी प्रयत्न केले जात असताना ऑनलाईन शिक्षणासाठी साधारण 5 कोटी रुपयांचा खर्च लागणार असल्याचं सांगितलं आहे.
त्यामुळे या विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचा नुकसान होऊ नये व प्रत्येकाला हे ऑनलाईन शिक्षण घेता यावे म्हणून मुंबई आयआयटीच्या संचालकांनी मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी व इतरांना या कामासाठी मदत करावी असं आवाहन फेसबुक पोस्टद्वारे केलं आहे.
साधारणपणे मुंबई आयआयटीच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पुढील सेमिस्टरचे वर्ग जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन आखले असून याद्वारे फेस टू फेस क्लास म्हणजेच विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्गाचा धोका टाळता यावा यासाठी वर्गात उपस्थित राहण्याची गरज नसून ऑनलाईनद्वारे हे विद्यार्थी आता वर्गात उपस्थित राहून शिक्षण घेतील. त्यामुळे मुंबई आयआयटीच्या कोरोनाच्या संकटात घेतलेल्या या निर्णयाचं स्वागत होत असून इतर संस्था सुद्धा येत्या काळात असा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.