मुंबई : आयआयटी बॉम्बेमध्ये शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप होत आहे. फेसबुकवर आयआयटी बॉम्बेच्या कन्फेशन पेजवरुन काही विद्यार्थ्यांनी आपल्यावर झालेल्या त्रासाला वाचा फोडली आहे. विशेष म्हणजे काही तरुणांनीही आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा केला आहे.


आरोपी विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतो. आयआयटीचे डीन सौम्य मुखर्जींनी त्याला 'मूड इंडिगो' या फेस्टिव्हलमध्ये मेंटॉर म्हणून नियुक्त केलं होतं. नवीन विद्यार्थ्यांना आयआयटी बॉम्बेच्या अभ्यासक्रमबाबत तो मार्गदर्शन करणार होता.

आरोपी विद्यार्थ्याने 15 ज्युनिअर विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केल्याच्या तक्रारी गेल्या सहा-सात महिन्यात आल्या आहेत. आयआयटी बॉम्बेच्या शिस्तपालन समितीकडे या तक्रारी आल्या होत्या. परिस्थितीजन्य पुरावे आरोपी विद्यार्थ्याचं निलंबन करण्यासाठी पुरेसे नव्हते, असं व्यवस्थापनाने सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणतीही कारवाई न झाल्यामुळे सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी आवाज उठवला आहे. आरोपी विद्यार्थ्यावर कारवाई झाली नाही, तर पदवीदान संमारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही काही विद्यार्थ्यांनी दिला आहे.